लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कर्मचारी व शिक्षकाना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील. असा इशारा राष्ट्रीय नागपुर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद टिंगणे व जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी मनपा प्रशासनाला मंगळवारी दिलेल्या नोटीस मधून दिला आहे
संपातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळण्यात आले आहे. ते काळ्या फिती लावून काम करणार असल्याची माहिती सुरेंद्र टिंगणे यांनी दिली.
मनपा कर्मचारी व शिक्षकाना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी संघटनेच्यावतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मनपा सभागृहाच्या निर्णयानंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.परंतु हा प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्यातील अनेक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. राज्य शासनाने याला मंजुरी दिली परंतु नागपूर महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. मनपा आयुक्त राधाकृष्ण यांनी यावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा बेमुदत संप अटळ असल्याची माहिती सुरेंद्र टिंगणे यांनी दिली.
४१८७ कर्मचाऱ्यांची सहमती
संपाचा निर्णय घेण्यापूर्वी संघटनेच्यावतीने यासाठी कर्मचाऱ्यांची कौल जाणून घेण्यात आला.यात ४१८७ कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला आहे. तर शिक्षकही या संपाला पाठिंबा देणार आहेत.