नागपूर : थॅलेसेमियाच्या तीन वर्षांच्या चिमुकलीसह चार लहान मुलांना रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याच्या गंभीर प्रकाराची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) घेतली. त्यांनी मुख्य सचिवांना व राज्याच्या अन्न व औषधी विभागाच्या (एफडीए) सचिवांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने या प्रकाराचा सर्वात आधी भांडाफोड केला.
नागपुरातीलच थॅलेसेमिया व सिकलग्रस्त चार मुलांना रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाली असून, यातील एकाचा मृत्यू झाला. दूषित रक्त दिल्याने ‘हेपॅटायटीस सी’ची पाच जणांना, तर ‘हेपॅटायटीस बी’ची दोन मुलांना लागण झाली. ही सर्व मुले १० वर्षांखालची आहेत. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशात आणताच नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली. आता ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा’नेही या वृत्ताची दखल घेत पीडित मुलांच्या मानवी हक्कांचे हे उल्लंघन असल्याचे निरीक्षण केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा किंवा प्रस्तावित केलेल्या कारवाईचा समावेश अहवालात अपेक्षित असल्याचेही नोटीसमध्ये नमूद आहे. याशिवाय, मृत मुलाच्या कुटुंबीयांना भरपाईची रक्कम आणि इतर पीडित मुलांसाठी राज्याने सुरू केलेल्या उपचारांचा अहवाल देण्यासही सांगण्यात आले आहे.
-सहा आठवड्यात अहवाल सादर करा
‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा’ने राज्याच्या अन्न व औषध विभागाच्या सचिवांना या प्रकरणातील प्राथमिक चौकशी आणि सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईबाबतचा अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याची नोटीसही बजावली आहे.