लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांतिनगर पोलिसांनी कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक चंपालाल यादव याच्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून ९ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईलसह एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.कुख्यात अशोक बाबाजी गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात जुगार अड्डा चालवतो. त्याच्या जुगार अड्ड्यावर रोज लाखोंची हार-जीत होते. या जुगार अड्ड्यावर केवळ नागपूर-विदर्भ नव्हे तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांतूनही जुगारी जुगार खेळायला येतात. लाखोंचा डाव लावून अशोक भावाची मोठ्या प्रमाणात नाल काढतो. दरम्यान, कोरोनाच्या धाकामुळे सर्वत्र सामसूम आहे. अनेक जण एकत्र बसण्याचे टाळत असताना बाबाजीने त्याच्या इतवारी रेल्वेस्थानकाजवळच्या घरी रविवारी जुगाऱ्याना बोलून अड्डा सुरू केला. ही माहिती कळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनगरचे ठाणेदार उईके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास बाबाजीच्या जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी तेथे ९ जुगारी तासपत्त्याचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून १७ हजार पाचशे रुपये, १२ मोबाईल, चार दुचाकी आणि अन्य साहित्यासह एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईची कुणकूण लागल्यामुळे अशोक बाबाजी छापा पडण्यापूर्वी पळून गेला. पोलिसांनी मध्यरात्री त्यालाही शोधून आणले. या सर्वांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा तसेच कोरोनामुळे लागलेल्या मनाई हुकुमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.अटकेतील जुगारीअटक करण्यात आलेल्यांमध्ये कुख्यात अशोक बाबाजीचा पुतण्या गनी मन्नालाल यादव, राजू रतन सेठिया, प्रसना राजकुमार जैन, आनंद भगवानदास श्रीवास्तव, आशिष चंद्रभान ठाकूर, राजू चरणदास खुराना, चरण कल्लू गौर, श्याम मनोहरलाल पुरवाल आणि विशाल अंबादास मेश्राम यांचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्री अशोक यादव यालाही पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली.