लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पोलिसांनी अनेकदा रंगेहात पकडलेला कुख्यात बुकी राहुल रमेश अग्रवाल (वय ४५, रा. संत्रा मार्केट, गणेशपेठ) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री मुसक्या बांधल्या.
राहुल अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्ट्याच्या गोरखधंद्यात सक्रिय असून, तो पूर्वी कुख्यात बुकी रम्मू अग्रवालसोबत क्रिकेट बेटिंगचे काम करायचा. त्याला यापूर्वी पोलिसांनी अनेकदा अटक केलेली आहे. तो आता त्याच्या सदनिकेतच सट्टा घेतो, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक त्याच्यावर नजर ठेवून होते. बुधवारी रात्री तो दिल्ली-हैदराबाद दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करीत असल्याचे कळाल्याने पोलिसांनी त्यांच्या अड्ड्यावर छापा मारला. यावेळी तो रंगेहात पकडला गेला. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल, टीव्ही, रोख ६८ हजार असा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. युनिट तीनचे निरीक्षक प्रदीप रायन्नावार, सहायक निरीक्षक माधुरी नेरकर, हवालदार अनिल जैन, श्याम अंगुथेलवार, दशरथ मिश्रा, शैलेष शेंडे, नायक श्याम कडू, अनुप तायवाडे, संदीप मावळकर, विशाल रोकडे, दीपक लाकडे आणि वर्षा हटवार यांनी ही कारवाई केली.
----
स्काय लाईव्हवर खायवाडी
आरोपी राहुल आणि शहरातील अन्य बुकी स्काय लाईव्ह आणि अशाच प्रकारची वेगवेगळी आयडी वापरून सट्टा बाजारात रोज लाखोंची खायवाडी करीत आहेत. राहुल आधी रम्मूसोबत कोट्यवधींच्या बेटिंगमध्ये सक्रिय होता. त्याचा रोहित नामक साथीदार पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---