नागपूर : रस्त्यावर महिलेसह तिच्या नातेवाईकांवर हल्ला करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
रमजान उर्फ मुनिर इकराम अंसारी (१९,सबीना ले-आउट, आजरी माजरी, यशोधरानगर) असे आरोपीचे नाव असून त्याचा पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शोध सुरू होता. २५ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बिसमिल्ला रफीक कनोज (३७, पारडी), त्यांचा दीर इकबाल शेख अजिज शेख (४०, नंदनवन), राजु शंकर धमगाये (३९), व दिनेश लालदास बांते ( नविन नगर, पारडी) हे चौघे दोन मोटारसायकलवर बसून बाराव्दारी पारडी येथुन श्याम नगर कडे जात होते. त्यावेळी रमजान वेगाने कार घेऊन आला. कनोज यांनी त्याला जाब विचारला असता तो कारच्या बाहेर आला.
त्याने कनोज यांच्या कुटुंबातील एका मुलीला पळवून नेले होते व त्या प्रकरणात रमजानला अटकदेखील झाली होती. तो राग असल्याने त्याने अगोदर इकबाल शेखच्या पाठीवर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर राजुच्या पाठीवर व हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्याने कनोज व त्यांचा मुलगा साहिलवरदेखील चाकूने वार केले. पारडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हयाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्समधून रमजानचा ठावठिकाणा कळला. पोलिसांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याविरोधात पाचपावली, एमआयडीसी, सक्करदरा, कळमना, इमामवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे, सफी, खोरडे, अनिल जैन, मुकेश राउत, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, संतोष चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.