लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तुलांच्या तस्करीत गुंतलेल्या एका कुख्यात गुंडाला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले असून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे. शेख नदीम ऊर्फ गोल्डन राजा शेख नाजीम (वय २३) असे आरोपीचे नाव असून तो मोठा ताजबाग परिसरातील सिंधीवनमध्ये राहतो.
सक्करदरा पोलिसांचे पथक शनिवारी रात्री गुन्हेगारांच्या मागावर असताना कुख्यात गोल्डन राजा आशीर्वाद नगरातील एका टिनाच्या शेडखाली त्यांना संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी धाव घेताच तो पळू लागला. सक्करदरा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याजवळ एक पिस्तूल आढळले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता तो शस्त्र तस्करीत गुंतला असल्याचा खुलासा झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला. घरझडतीत त्याच्याकडे आणखी दोन पिस्तूल आढळले. ते जप्त करण्यात आले. कुख्यात गोल्डन राजा अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असून त्याचे अनेक गुन्हेगारांशी संबंध आहेत. त्याला यापूर्वीसुद्धा शस्त्र तस्करीत आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार पोलिसांनी अटक केली होती. याशिवायही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. गोल्डन राजा सध्या सक्करदरा पोलिसांच्या पीसीआरमध्ये असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सक्करदराचे ठाणेदार सत्यवान माने यांनी वर्तविली आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत त्याने हे पिस्तूल अफसर नामक गुंडाकडून घेतल्याचे सांगितले आहे. मात्र तो दिशाभूल करीत असावा असाही पोलिसांचा संशय आहे. त्याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त अक्षय शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय मराठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, द्वितीय निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आर. ए. बस्तवाडे, पीएसआय संतोष इंगळे, हवालदार राजेंद्र यादव, शिपाई गोविंद, रोहन, नीलेश, पवन आणि आरती यांनी ही कामगिरी बजावली.
काही दिवसांपूर्वी कुख्यात गोल्डन राजाने छोटू ऊर्फ शेख शाकीर याला एक पिस्तूल पस्तीस हजार रुपयात विकले होते. या पिस्तुलातून गोळी झाडून आरोपी शाकिरने गेल्या आठवड्यात भाजीविक्रेता उमेश ढोबळे यांची हत्या केली. सध्या तोसुद्धा सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून मिळालेल्या महितीवरूनच कुख्यात राजा पोलिसांना सापडला आहे.