लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील कुख्यात गुंड विक्की दामोदर रोकडे (वय ३५) याची कोतवालीतील गुंडांनी क्षुल्लक कारणावरून भीषण हत्या केली. शनिवारी (दि. १७) रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास ही थरारक घटना कोतवालीतील शिवाजीनगरात घडली.
रोकडे आणि त्याचा मित्र मुकेश रमेश वासनिक (वय ३५, रा. चंदननगर) हे त्यांच्या मित्राकडे शनिवारी रात्री जेवण करायला गेले होते. आरोपी भूषण भुते, सारंग बावणकुळे (रा. भूतेश्वरनगर), क्रिष्णा मोंदेकर आणि शुभम मोंढे (रा. शिवाजीनगर) रात्री १०च्या सुमारास एकमेकांसमोर आले. एकमेकांकडे नजर रोखत बघितल्याच्या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. तेव्हा कसेबसे निपटल्यानंतर एकमेकांना धमकी देऊन रोकडे, वासनिक तसेच आरोपी भुते आणि त्याचे साथीदार तेथून निघून गेले.
दीड तासानंतर शिवाजीनगर गेटजवळ आरोपींनी रोकडेला घेरले आणि धारदार शस्त्राचे घाव घालून तसेच नालीवर असलेले सिमेंट काँक्रीटच्या झाकणाने ठेचून रोकडेची हत्या केली. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच कोतवालीचा पोलीस ताफा तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी धावले. वासनिकने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली.
मृत रोकडे हा अजनीतील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपींवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. मृताचा आरोपींसोबत रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला. त्याच्या दोन तासानंतर आरोपींनी रोकडेची हत्या केली. किरकोळ वादाच्या दोन तासानंतर आरोपींनी ठरवून केल्याप्रमाणे रोकडेचा गेम केल्याची बाब खटकत आहे. रोकडेचे अनेक शत्रू होते. मात्र आरोपींसोबत त्याचे शत्रुत्व नव्हते. त्यामुळे आरोपींना सुपारी देऊन ही हत्या करवून घेतली असावी, अशी जोरदार चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे.
कोतवालीत गुन्हेगार मोकाट
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. शहरातील अनेक भागातील कुख्यात गुन्हेगारांची वर्दळही वाढली आहे. याउलट कोतवालीचे ठाणेदार मात्र दिवसरात्र ‘भलताच हिशेब’ करण्यात व्यस्त असल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी उलटसुलट चर्चा करतात. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी दिवसाच नव्हे तर मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर पायी गस्त करताना, गुन्हेगारांची तपासणी करताना दिसतात. ठाणेदार मुकुंद ठाकरे मात्र अनेकदा रात्री ९ नंतर ‘आउट ऑफ कव्हरेज किंवा नो रिप्लाय मोडवर’ असतात.
७ तासांत हत्येचा दुसरा गुन्हा
७ तासांत घडलेली हत्येची ही दुसरी घटना होय. शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आरोपी दीपेश भजनलाल पाचे आणि साहिल शाैकत शाह या दोघांनी चेतन कमलसिंग ठाकूर (वय २०) याची कळमन्यात हत्या केली होती. त्या हत्येचा गुन्हा दाखल होत असतानाच तिकडे कोतवालीतही हत्या घडली.