लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड आणि कोलमाफिया हाजी याला अखेर आज भल्या सकाळी नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शस्त्र तस्करीच्या आरोपात पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. तो गेल्या दहा दिवसांपासून एटीएससोबत लपवाछपवीचा खेळ करत होता. हाजी वर्धा जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या परिसरात लपून असल्याचे कळताच एटीएसने त्याच्या मुसक्या बांधून त्याला नागपुरात आणले.बिहारमधील सुपत सिंग (रा. लक्ष्मीपूर, मुंगेर) तसेच यवतमाळ (वडगाव) येथील संजय संदीपान खरे या दोघांना बिहारमधून येणाऱ्या रेल्वेगाडी क्रमांक ०७०१० बरोनी-सिकंदराबाद स्पेशल एक्स्प्रेसमध्ये एटीएसने २४ जानेवारीच्या रात्री पकडले होते. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे पकडण्यात आली होती. या दोघांची एटीएसने चौकशी केली असता, त्यांनी या पिस्तूल आणि जिवंत काडतुसाची खेप चंद्रपूरच्या हाजीला देणार होतो, असे सांगितले होते. तेव्हापासून हाजीचा शोध घेण्यासाठी एटीएस जागोजागी छापेमारी करीत होती तर, हाजी एटीएसच्या पथकाला चकमा देत इकडेतिकडे लपून दिवस काढत होता. रविवारी रात्रीच्या वेळी हाजी वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील सुप्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या परिसरात दडून असल्याची माहिती एटीएसच्या नागपूर पथकाला कळाली. त्यावरून भल्या पहाटे एटीएसचे पथक तेथे पोहचले आणि हाजीचा शोध घेऊन एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. हाजीकडे एटीएसला एक पिस्तूल (कट्टा) सापडले. त्याला नागपुरात आणून एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हाजीला ७ फेब्रुवारीपर्यंत कस्टडी मंजूर केली.विदर्भातील गुन्हेगारीचा केंद्रबिंदूहाजी हा चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील कुख्यात गुन्हेगारांचा ‘मदतगार’ म्हणून कुपरिचित आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो खंडणीसाठीही कुख्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा चोरीचा केंद्रबिंदू म्हणून तो ओळखला जातो. त्याला त्यातून प्रति महिना लाखो रुपये देण मिळते. विदर्भातील गुन्हेगारांमधील मांडवलीसाठीही त्याचे नाव घेतले जाते.शेख हाजी बाबा शेख सरवर असे आरोपीचे नाव आहे. मात्र, गुन्हेगारी जगतात आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर तो हाजी म्हणूनच कुख्यात आहे. त्याच्यावर तडीपारी, मोक्कासारखी कडक कारवाईदेखील झाली आहे. गुन्हेगारांना फरारीच्या, हद्दपारीच्या कालावधीत कुठे लपवायचे, त्यांची व्यवस्था कशी व कुठे करायची, ते सर्व हाजी सांभाळतो. तो अत्यंत धूर्त आहे. आपले लोकेशन आणि गुन्हेगारांशी असलेला संपर्क, संबंध पोलिसांच्या रेकॉर्डवर येऊ नये म्हणून हाजी गुन्हेगारांशाी फोनवर बोलण्याचे टाळतो. प्रत्यक्ष भेटीतून किंवा माणसं पाठवून (कुरियर) तो गुन्हेगारांच्या संपर्कात राहतो.कोणता होता गेम प्लान?नागपुरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्येही त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो. कोणता गेम कसा करायचा, त्याचे कट रचण्याचे कामही अनेक गुन्हेगार हाजीच्या माध्यमातूनच करवून घेतात. अॅक्सिस बँकेतील दरोड्यात आरोपी असलेल्या असलम खान आणि मानकापुरातील कुख्यात करीम लालासोबत गेल्या काही दिवसांपासून तो कुरियरच्या माध्यमातून संपर्कात होता, अशी चर्चा आहे. कसून तपास झाला तर ते कोणता गेम करण्याच्या तयारीत होते, त्याचा उलगडा होऊ शकतो.