लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कुही) : पार्टी करण्याच्या बहाण्याने कुख्यात गुंड कार्तिक शिवरामकृष्ण तेवर याला शहराबाहेर एका फार्महाऊसवर नेऊन सहा जणांनी चाकू तसेच बीअरच्या बॉटल्सनी हल्ला चढवून त्याची हत्या केली. तर, त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या सूरज रामदास नायडू (१९, रा. नागपूर) यालाही गंभीर जखमी केले. कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात रविवारी मध्यरात्री हा थरार घडला.कार्तिक तेवर हा कुख्यात गुंड होता. तो खतरनाक गुन्हेगार दिवाकर कोतुलवार याचा नंबरकारी होता. सध्या त्याने आपली स्वत:ची टोळी बनविली होती आणि तो खामल्यातील साथीदाराच्या मदतीने प्रॉपटी डीलिंगच्या नावाखाली अवैध जमिनीचा व्यवहार करीत होता. लाखो रुपयांची हेरफेर होत असल्याने त्याच्याकडे गुन्हेगारातील मित्र आणि शत्रू अशा साऱ्यांचीच नजर लागली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तो खटकत असल्याने काही जणांनी त्याच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, आरोपींनी रविवारी रात्री त्याला डोंगरगाव शिवारातील एका फार्महाऊसवर नेले. पार्टीत आशिष मनोरे, संतोष निनावे यांच्यासह शुभम भगवान वानखेडे, रा. राधेश्याम सोसायटी, मनीषनगर, नागपूर तसेच संदीप ईश्वर कौशिक (रा. मनीषनगर, कैकाडीनगर, नागपूर), सूरज रामदास नायडू (१९, रा. नागपूर) आणि अन्य काही गुन्हेगारांचा पार्टीत सहभाग होता. त्या पार्टीत सहभागी झाले होते.पार्टी सुरू असतानाच आशिष व संतोषचे इतरांसोबत भांडण झाले. कार्तिक व सूरजने दोन्ही गटांना शांत करीत भांडण मिटविले. मात्र, आधीच तयारीत असलेल्या आशिष, संतोष आणि साथीदारांनी भांडण का मिटविले, असा सवाल करून आरोपींनी कार्तिक तसेच सूरजला मारहाण करायला सुरुवात केली. काहींनी कार्तिकच्या डोक्यावर बीअरच्या बॉटल्स फोडल्या तर काहींनी चाकूने वार केले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कार्तिकच्या मदतीला धावलेल्या सूरजवर गंभीर हल्ला झाल्याने तोसुद्धा यात गंभीर जखमी झाला. त्याला नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.मोक्काची कारवाई झाली होतीकार्तिक हा कोतुलवार टोळीचा नंबरकारी म्हणून गुन्हेगारी क्षेत्रात कुख्यात होता. यापूर्वी त्याच्याविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याचा गेम गुन्हेगारांनी आधीच कट रचून केल्याची जोरदार चर्चा यानिमित्ताने गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उमरेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभारी) राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलिसांनी भादंवि ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक पंजाबराव परघणे प्रकरणाचा तपास करीत आहेत.