फळ व्यापाऱ्याकडून मागितला होता ६८ लाखाचा हप्ता : आर्थिक शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट दस्तावेजाचा आधार घेऊन प्लॉटची रजिस्ट्री करून वृद्ध फळ व्यापाऱ्याला ६८ लाख रुपयाचा हप्ता मागण्याच्या प्रकरणात आर्थिक शाखेने कुख्यात बग्गाच्या सासऱ्याला अटक केली आहे. मंगळवारी न्यायालयातून जामीन रद्द झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी अशोक खट्टर (६०) हा क्वेटा कॉलनीत राहणारा आहे. कुख्यात बग्गा, प्रशांत सहारे, गुरुप्रीतसिंह सरदीपसिंह रेणू आणि त्याच्या अन्य साथीदारांचा अद्याप पत्ता लागलेला नही. खट्टरला न्यायालयापुढे हजर करून २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. वाठोडा पोलिसांनी हे ठगबाजीचे प्रकरण ३ नोव्हेंबरला दाखल केले होते. यात प्रशांत सहारे, बग्गा, अशोक खट्टर तसेच गुरुप्रीतसिंह सरदीपसिंह रेणू यांना आरोपी बनविण्यात आले होते. वर्धमाननगरातील फळ व्यापारी तंवरलाल छाबरानी (७५) यांचा वाठोड्यातील आदिवासी समाज उन्नती गृह निर्माण सहकारी संस्थेत प्लॉट होता. संगीता राहाटे यांच्याकडून २०१४ मध्ये त्यांनी तो ५३ लाख रुपयात खरेदी केला होता. मात्र १ ऑक्टोबरला छाबरानी यांच्या कर्मचाऱ्याला प्लॉटवर गुरप्रीतसिंह यांच्या नावाचा बोर्ड दिसला. छाबरानी यांनी गुरप्रीतसिंह यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रशांत सहारे यांच्याशी बोलण्यास सांगितले. सहारे याने उत्तमराव भजनकरकडून प्लाॅटचा कब्जा मिळाल्याचे सांगितले. अखेर छाबरानी यांनी वाठोडा पोलिसात तक्रार नोंदविली. यादरम्यान सहारे यानेही प्लाॅटवर आपला बोर्ड लावला. छाबरानी यांचा मुलगा रमेश याला बग्गाने फोन करून प्लॉटवर न येण्याची धमकी देऊन ६८ लाख रुपयाची मागणी केली. यानंतर सहारे-बग्गा टोळी आणि त्यांच्या साथीदारांकडून छाबरानी यांना हप्ता देण्यासाठी धमक्या सुरू झाल्या.
हे प्रकरण कानावर येताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन्ही पक्षांना पाचारण केले. यात सहारे-बग्गा यांची धोकेबाजी पुढे आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल होताच आरोपी अग्रिम जमानतीसाठी न्यायालयाला शरण गेले. मंगळवारी जामीन रद्द होताच पोलिसांनी अटक केली. बुधवारी खट्टर पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणात प्रशांत सहारे आणि बग्गा सूत्रधार आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अशोक खट्टर हा बग्गाचा सासरा आहे. ते दोघेही एकत्रच राहतात.