कुख्यात माओवादी प्रशांत राही याला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:08 PM2020-09-23T22:08:13+5:302020-09-23T22:09:51+5:30
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
राही हा माओवादी चळवळीचा मास्टरमाईन्ड जी. एन. साईबाबाचा साथिदार आहे. त्याने कारागृहात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे शिक्षेवर स्थगिती व जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता त्याला दणका दिला. राहीचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मागण्याचा हा तिसरा अर्ज होता. तो डेहराडून (उत्तराखंड) येथील रहिवासी आहे. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने राही व इतर काही आरोपींना बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली आहे. आरोपींविरुद्ध दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्हे सिद्ध झाले आहेत. राहीने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ते अपील अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने त्या अपीलवर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.