लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अवैध सावकारीच्या व्यवहारातून एका मेडिकल स्टोअरच्या संचालकाचे अपहरण करून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर तीन कोटी रुपयांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड राकेश वासुदेव डेकाटे (रा. उज्ज्वल नगर, सोनेगाव) याला अखेर प्रतापनगर पोलिसांनी जेरबंद केले.फिर्यादी सचिन नंदकुमार बडजाते यांचे प्रतापनगरात मेडिकल स्टोअर्स आहे. जून ते नोव्हेंबर २०१४ दरम्यान सचिन यांनी कुख्यात राकेश डेकटेकडून १ कोटी १८ लाख रुपये उधार घेतले होते. त्या बदल्यात पुढच्या तीन वर्षात डेकाटे याने त्यांच्याकडून १ कोटी ८० लाख रुपये वसूल केले. त्यानंतरही अधिक रक्कम पाहिजे म्हणून तो सचिन आणि त्यांचे बंधू श्रेयांश बडजाते यांना धमकावत होता. अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. बडजाते बंधूकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ३० आॅक्टोबर २०१९ ला आरोपी राकेश डेकाटेने रिव्हॉल्व्हरच्या धाकावर श्रेयांश बडजाते यांचे अपहरण केले. त्यांना सफारी कार मधून अज्ञात ठिकाणी नेले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली. कशीबशी सुटका झाल्यानंतर श्रेयांश यांनी हा प्रकार त्यांचे बंधू सचिन यांना सांगितला सचिनने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राकेश डेकाटे विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच डेकाटे फरार झाला. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे तो लपूनछपून राहू लागला. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत होते. १३ एप्रिलला आरोपी राकेश हा त्याच्या घरी आल्याची माहिती कळताच रात्रीच्या वेळी पोलिसांनी तेथे धडक दिली. मात्र पोलीस आल्याचे पाहून त्याने आधी दारच उघडले नाही. कारवाईचा धाक दाखविल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दार उघडले. तो घरी नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी त्याच्या घराची कसून तपासणी केली तेव्हा तो बेडरुमच्या कपाटात लपून असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगरचे ठाणेदार बी. एस. खनदाळे, पीएसआय वसंत पवार, हवालदार अनिल ब्राह्मणकर, शेखर गायकवाड, नायक अभिषेक हरदास, सतीश आनंद, अतुल आणि महिला पोलीस शिपाई पल्लवी, जोत्स्ना आणि रजनी यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात तीन कोटींची खंडणी मागणारा कुख्यात राकेश डेकाटे अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:31 PM