लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका दारू वितरकाचे अपहरण करून त्याला दहा लाखांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड शेखू खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले.शहरातील टॉप - १० गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या म्होरक्यापैकी एक असलेला कुख्यात शेखू थंड डोक्याचा गुन्हेगार मानला जातो. त्याने भाजयुमोचे हेमंत दियेवार यांची वर्दळीच्या शंकरनगर चौकात अनेकांसमोर निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडानंतर शेखू प्रकाशझोतात आला होता. या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर शेखूने आपली टोळी तयार करून शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही शेखूच्या टोळीची दहशत आहे. तो कोळसा व्यापाराच्या नावाखाली कोळसा तस्करी करणारे, दारू तस्कर, दारू विक्रेते, अवैध धंदेवाल्यांना मदत करतो आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून महिन्याला लाखोंची खंडणी वसूल करतो. अशाच एका दारू विक्रेत्याचे अपहरण करून त्याला १० लाखांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात पोलिसांना तो वॉन्टेड होता. गेल्या अनेक दिवसांपासून शेखू पोलिसांसोबत ‘ चुहा बिल्ली’चा खेळ खेळत होता. मांडवली करणाऱ्यांच्या माध्यमातून त्याने पोलिसांकडे सरेंडर करणार, असा मेसेजही पाठविला होता. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शुक्रवारी सकाळी तो धरमपेठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक त्याच्या मागावर होते. दुपारी १२ च्या सुमारास तो साथीदारासह एका वाहनात बसून असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, पोलीस जवळ येण्यापूर्वीच शेखूने तेथून धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी सांगत होते.
स्नेहलची भूमिका महत्त्वाची !कुख्यात शेखूची प्रेयसी स्नेहल सुधीर पीटर हिची शेखूच्या गुन्हेगारीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शेखूच्या टोळीतील गुंडांना घर मिळवून देणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, खंडणीची रक्कम जमवून ठेवणे, अशी जबाबदारी ती पार पाडते. तिला न्यायालयीन कस्टडीत पाठविण्यात आले आहे. तर, शेखूसह अन्य एकूण सातजण आता पोलीस कस्टडीत आहेत. शेखूसह त्याच्या टोळीतील बहुतांश खतरनाक गुन्हेगार पकडले गेल्यामुळे त्याच्या टोळीचे नेटवर्क आता कारागृहाच्या भिंतीआड झाले आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात एपीआय एस. आर. परतेकी, पीएसआय एल. जी. तांबुसकर तसेच पोलीस कर्मचारी सीतानाथ पांडे, मोहन शाहू, प्रकाश वानखेडे, रामनरेश यादव, अरविंद झिलपे, सतीश पांडे, मंजितसिंग, सतीश पाटील, रविकुमार शाहू, श्याम गोरले, योगेश गुप्ता, सय्यद वाहिद आणि शिपाई अश्विन यांनी ही धाडसी कामगिरी बजावली.