लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध राज्यातील पोलिसांना वॉन्टेड असलेला खतरनाक गुन्हेगार सिजो चद्रन एलआर चंद्रन नडार (वय ३८) याच्या अजनी पोलिसांनी केरळमध्ये जाऊन मुसक्या बांधल्या. त्याला आज नागपुरात आणून कारागृहात डांबण्यात आले.सिजो अत्यंत खतरनाक गुन्हेगार असून त्याच्यावर मध्य प्रदेशात अपहरण, लुटमार, आंध्र प्रदेशात लुटमार, हत्या, तेलंगणात लुटमार, प्राणघातक हल्ला तर वाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अटक करून शहर पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले होते. त्याला विविध व्याधी जडल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला पोलिसांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २० जुलैला सकाळी ७ वाजताच्या सुमारास तो पळून गेल्याने एकच खळबळ उडाली. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सिजोचा शोध सुरू केला. त्याने पोलिसांना आपण दिल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात तो वटप्पारा, तिरुवनंतपुरम (केरळ) चा रहिवासी होता. तेथे तो पळून गेल्याचे कळताच परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रौशन, सहायक आयुक्त रमेश घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे ठाणेदार उरलागोंडावार यांनी पोलीस उपनिरीक्षक चप्पे, एएसआय राजेंद्र पाटील, गणेश जामदार, हेमलाल कोंडे, भगवती ठाकूर आणि आशिष राऊत यांचे पथक तिकडे पाठविले. या पथकाने वटप्पारा पोलिसांच्या मदतीने सिजोला ताब्यात घेतले. त्याला आज नागपुरात आणल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.