नागपूर : कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर याच्याविरोधात नागपूर पोलिसांनी कायद्याचा विळखा घट्ट केला आहे. त्याच्याविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई झाली असताना त्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्याने ५० हजाराच्या खंडणीसाठी सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
गणेश उर्फ गुही आनंदराव चाचेरकर (३९, गोरेवाडा) असे तक्रारदाराचे नाव आहे. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते गोरेवाडा फॉरेस्ट गेटजवळ उभे होते. गणेशची सुमित ठाकूरसोबत जुनी ओळख आहे. सुमित गणेशला तेथे भेटला व त्याने ५० हजारांची मागणी केली. गणेशने पैसे नसल्याचे सांगताच सुमित भडकला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व ‘मला ओळखत नाही का? तुला मला पैसे तर द्यावेच लागतील, नाही तर ठार मारेन’ अशी त्याने धमकी दिली.
सुमित ठाकूरच्या कारवायांबाबत चांगलीच माहिती असल्याने गणेशने तेथून पाय काढता घेतला. १६ ऑक्टोबर रोजी सुमितने तीन तरुणांचे शस्त्रांच्या धाकावर अपहरण करून लुटले व तो पोलिसांच्या परत रडारवर आला. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होऊन कारवाई झाल्यावर गणेशने हिंमत दाखविली व गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुमितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भितीपोटी अनेकांकडून तक्रार नाही
सुमित ठाकूर व त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांची दहशत आहे. त्यांनी अनेकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या आहेत. त्यांच्या भितीपोटी बहुतांश जण पोलिसांत जाण्याचे टाळतात. त्यामुळे तक्रारीचे प्रमाण कमी आहे.