लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुणाच्या खिशातील रोकड असलेले पाकीट चोरून नेणाऱ्या आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. मयूर अनिल कायरकर (वय २९) असे आरोपीचे नाव असून तो अजनीतील राजकमल चौकाजवळ राहतो. हिंगण्याजवळ सुमंगल विहारमध्ये राहणारे यश संतोष पालीवाल (वय २१) हे काही दिवसांपूर्वी महालमधील टिळक पुतळ्याजवळ एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी जात होते. दुचाकीवर लाल शर्ट घालून असलेल्या आरोपीने त्यांच्या खिशातील पाकीट काढून पळ काढला. त्या पाकिटात ३० हजार रुपये, एटीएम कार्ड, आधार कार्ड होते. ही माहिती मिळाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आरोपीच्या दुचाकीचा नंबर मिळवून त्या आधारे शोध सुरू केला. रविवारी आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पालीवाल यांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, तीस हजारांची रोकड तसेच गुन्ह्यातील ज्युपिटर दुचाकी जप्त केली. आरोपी कायरकर हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.महिला चोरट्या गजाआडऑटोत बसलेल्या प्रवाशाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना जरीपटका पोलिसांनी अटक केली. सागण जुगनू पात्रे (४५) आणि रिता चंदन पात्रे (३५) अशी या चोरट्या महिलांची नावे असून, त्या कन्हानजवळच्या सत्रापूर येथील रहिवासी आहेत. सुनिता डेव्हिड साळवे (वय ५९, रा. बेझनबाग कॉलनी) या त्यांच्या बहिणीसह १० ऑगस्टला इतवारीत दागिने घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी सोन्याचे लॉकेट आणि सोनसाखळी विकत घेतली आणि दागिने पर्समध्ये ठेवून त्या घराकडे जाण्यासाठी निघाल्या. शहीद चौकातून त्या एका ऑटोत बसल्या. या ऑटोत आधीच उपरोक्त आरोपी महिला बसून होत्या. संधी साधून त्यांनी सुनिता यांच्या दागिन्याची पर्स लंपास केली. ११ऑगस्टला सुनिता यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. ऑटोच्या नंबर प्लेटवर त्यांना ०८४९ लिहिलेले दिसले होते. तेसुद्धा त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याआधारे पोलिसांनी ऑटोचालकाचा शोध घेऊन तो कुठून कुठे गेला होता, त्याची माहिती घेतली. महिला कन्हानकडे गेल्याचे कळल्यावर पोलिसांनी तिकडे नजर ठेवली. रविवारी या आरोपी महिला कामठी परिसरात फिरताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याची साखळी आणि लॉकेट असा २७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघींनी आणखी काही चोऱ्या केल्या का, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरात कुख्यात चोरटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 1:31 AM