नागपूर : राज्य सरकार शिवरायांचे स्मारक उभारणार आहे. मात्र त्यांचे स्मारक व्हायचे तेव्हा होईल, त्यापूर्वीच आपले शब्दस्मारक आलेले असेल, असा विश्वास प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
नागपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपल्या महासम्राट या कादंबरीमालेची माहिती दिली. ते म्हणाले, महासम्राट ही कादंबरीमाला चार खंडांची असेल. त्यातील पहिला खंड ‘झंझावात’ लवकरच वाचकांपुढे येत आहे. यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचे कथानक अर्थात शहाजीराजे यांच्या जीवनकार्याचा पट आहे. दुसरा खंड ‘रणखैंदळ’ या नावाने असून, १६६१ ते १६६४ त्यात शिवरायांच्या बालपणातील चार वर्षांचा काळ उभा केला आहे. आपल्या साहित्यकृतीवर वाचकांनी नितांत प्रेम केले आहे. याचेही ते स्वागत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, शिवराय समजायचे असतील तर पिता, माता आणि शिवराय या त्रिकुटाला समजून घेतल्याशिवाय ते कळणार नाही. शूर असलेल्या शहाजीराजांनी भातोडीमध्ये १६२४ मध्ये पहिले गनिमीकाव्याचे युद्ध केले. एक लाख सैन्याविरुद्ध ते अवघे ४० हजारांचे सैन्य घेऊन येथील निसर्ग, दऱ्या, डोंगर, माती, भौगोलिक आणि नैसर्गिक स्थितीचा आधार घेऊन गनिमीकाव्याने लढले. तोच मार्ग शिवरायांनी अनुसरला. माता जिजाऊंनी शिवराय उदरात असताना जे दिवस भोगले, अवघ्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंना भर पावसात आश्रयासाठी फिरावे लागले, हा सर्व इतिहास कुठेच दिसत नाही.
पोर्तुगीजांच्या पत्रातून तो उघड होतो. हे लेखन करण्यासाठी आपण त्या सर्व ऐतिहासिक साहित्याचे अध्ययन केले. २५० किल्ले स्वत: पाहिले. अनेकदा भ्रमंती केली. शिवरायांकडे आपण केवळ चरित्रनायक म्हणून पाहात नाही; तर त्यांच्या संपूर्ण चळवळीचे आयुष्य यावे, त्यांचे अष्टावधानी रूप निखळपणे पुढे यावे, हा आपला हेतू आहे. आपली लेखनी वाहवत जाणार नाही. राजकीय फायद्यापोटी किंवा जातीय अभिमानापोटी आपण हे साहित्य निर्मिले नाही, तर लेखकाने सच्चा इतिहास मांडावा, ही आपली त्यामागील भावना आहे. शिवरायांचे विराट स्वरूप सांगणे गरजेचे होते. त्यामुळे ही कादंबरी चार खंडांत येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला केशव-कृष्ण फाैंडेशनचे राजा भोयर उपस्थित होते.