सुमेध वाघमारे
नागपूर : अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांपासून ते स्मृतिभ्रंश, अल्झायमर, मेंदूला दुखापती, निद्रानाशासह मानसिकदृष्ट्या लैंगिक समस्यांवर मेयो, मेडिकलमध्ये उपचाराची सोय होणार आहे. यासाठी या दोन्ही रुग्णालयाच्या मानसिक रोग विभागात ‘मेंटल हेल्थ लॅब’ सुरू होत आहे. याला लागणारे आवश्यक यंत्र सामूग्री नुकतीच उपलब्ध झाली आहे. रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी अद्ययावत यंत्राचा मदतीने निदान व उपचारासोबतच संशोधन होण्यासाठी ‘मे लॉजिकमॅक्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे’ यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला ‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’चा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची गरज व उपयुक्तता तपासणीसाठी पाच सदस्यांची समीती स्थापन करण्यात आली. समितीच्या बैठकीत या सारख्या प्रकल्पाची गरज असल्याचे पुढे आले.
या ‘लॅब’मुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास, रुग्णसेवेचा दर्जा वाढविण्यास, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्याचे मनोविकृतीशास्त्र विभागातील शिक्षण व संशोधनास मदत होण्यास तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकृतीशास्त्र विभागांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यानुसार मनोविकृतीशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही ‘लॅब’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवा
ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मनोविकृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु आहे, त्यांच्याकडे आवश्यक जागा, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ आहे, अशा संस्थामध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी सरकारकडून १२ अद्यायावत यंत्रसामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- या आजाराच्या रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार
‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’मध्ये मेयो, मेडिकलला यंत्रसामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ‘अॅव्हर्शन थेरपी यंत्र’ाचा मदतीने दारू, धूम्रपान, ड्रग्ज इत्यादी व्यसनी लोकांवर उपचार, ‘मल्टी बिहेवियर थेरपी यंत्र’ाच्या मदतीने मानसिकदृष्ट्या लैंगिक समस्यावर उपचार, ‘मेमरी ट्रेकिंग यंत्र’ाच्या मदतीने वाढत्या वयामुळे येणारा स्मृतिभ्रंश, अल्झायमर, मेंदूला दुखापतीमुळे वाढलेल्या स्मृतीसंबंधातील समस्यांवर तर ‘इलेक्ट्रोस्लीप यंत्र’ाच्या मदतीने निद्रानाशावर उपचार करण्यात मदत होणार आहे.
या शिवाय अनेक मानसिक व न्युरोलॉजीकल विकारांवर यंत्राच्या मदतीने उपचार करणे अधिक सोपे होणार आहे.