लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला काय मिळाले, असा सवाल विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना विचारत या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.शुक्रवारी रविभवन येथे रिपाइं (आ) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आागामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत असलेल्या युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून युतीची समीक्षा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून तसा अहवाल पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती आरपीआयचे (ए) प्रदेश अध्यक्ष भूपेश थूलकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.थूलकर यांनी सांगितले की, या बैठकीत युतीसंदर्भातही मत घेण्यात आले. पदाधिकाऱ्यांचे मत युतीसंदर्भात अनुकूल दिसले नाही. रोजगार, शिष्यवृत्ती यावरही नाराजीचा सूर होता. भाजपसोबत २०१२ पासून युती आहे. युती करताना काही करारही करण्यात आले होते. मात्र त्याचे पालन झाले नसल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या युतीबाबत समीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युती झाल्यास रामटेक लोकसभेची जागा आम्हाला मिळण्याची मागणीही करण्यात येणार आहे. मात्र युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत लोकसभा मतदार संघाच्या प्रभारींची निवडही करण्यात आली.यावेळी भीमराव बन्सोड, राजू बहादुरे, आर.एस. वानखेडे, विनोद थूल, डॉ. मनोज मेश्राम, तेज वानखेडे, अशोक घोटेकर, एल.के. मडावी आदी उपस्थित होते.भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई कराकोरेगाव भीमा येथे झालेला प्रकार यंदा होता कामा नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणातील दोषी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणीही त्यांनी केली.
आता युतीबाबत आठवलेंच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 9:59 PM
भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला काय मिळाले, असा सवाल विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना विचारत या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देविदर्भातील पदाधिकाऱ्यांची युतीबाबत समीक्षा करण्याची मागणी