लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन समाज पार्टीतून बाहेर पडलेले असंतुष्ट पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन सेना नावाची संघटना गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजन सेनेचे संस्थापक किशोर उके व अध्यक्ष सागर डबरासे आहेत. अन्य पदाधिकारी असे, प्रभारी प्रफुल्ल माणके, उपाध्यक्ष दिलीप जयस्वाल, महासचिव संमदभाई कुरेशी, मिलिंद मसराम, महिला आघाडी प्र्रमुखपदी रेहना कुरेशी, उत्तर भारतीय आघाडी दिनेश तिवारी, मुस्लीम आघाडी प्रा. राजील अली तर युवा आघाडीची जबाबदारी ओपुल तामसागडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.बैठकीत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली. विशेष म्हणजे, विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुरेश माने व किशोर गजभिये आदींनी बसपातून बाहेर पडून डीआरएसी नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. महापालिका निवडणुकीत बसपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली नव्हती. एवढेच नव्हे तर विद्यमान नगरसेवकांनाही डावलण्यात आले होते. त्यामुळे बसपात वाद उफाळला होता. विलास गरुड यांच्यावर आरोप करणाऱ्यांना नंतर पक्षातून निलंबित करण्यात आले होते. या सर्वांनी एकत्र येऊन बहुजन सेनेची स्थापना केली आहे. या सेनेची सोमवारी बैठक घेण्यात आली. विलास गरुड पक्षाच्या नेत्या मायावती यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्येक निवडणुकीत पक्ष भाजपा व काँग्रेसच्या दावनीला बांधण्यात आला. या पक्षांचा उमेदवार विजयी होईल, असे उमेदवार देण्यात आले. त्यामुळे बसपाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. बाहेरच्या उमेदवारांना वेळेवर उमेदवारी देण्यात आली. महापालिका निवडणुकीत उमेदवारी विकल्या जात असल्याचा आरोप यावेळी सागर डबरासे व इतरांनी केला. बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजन सेना गठित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बसपातील असंतुष्टांची आता बहुजन सेना
By admin | Published: June 28, 2017 2:57 AM