सुमेध वाघमारे
नागपूर : लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट सौम्य लक्षणांपुरतीच मर्यादित राहिली; परंतु भविष्यात कोरोनाचे नवे ‘व्हेरिएंट’ येतच राहणार असल्याने ‘बूस्टर’ डोसचे महत्त्व वाढणार आहे. यामुळे ज्यांना इंजेक्शनच्या स्वरूपात हा डोस नको असेल त्यांच्यासाठी नाकावाटे म्हणजे ‘नेझल’ बूस्टर डोसचा पर्याय असेल. त्यासाठी मानवी चाचणीला नुकतीच मंजुरी मिळाली असून, राज्यात केवळ नागपुरात ही चाचणी पुढील दोन दिवसांत सुरू होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात आला आहे; परंतु देशात कोरोना लसीसंदर्भात बरेच प्रयोग अद्यापही सुरू आहेत. हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीची नागपुरातील गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच कोव्हॅक्सिनची ‘हेटेरोजिनस ट्रायल’ यशस्वी पार पडली. यात कोरोनाची एकच लस ‘इन्ट्रामस्क्युलर’ व ‘नेझल’द्वारे स्वयंसेवकांना देण्यात आली. याचे चांगले निकाल पुढे आल्याने आता महाराष्ट्रातून याच हॉस्पिटलला ‘हेटेरोजिनस बूस्टर ट्रायल’ला मंजुरी मिळाली आहे. याला या हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दुजोरा दिला आहे.
- १८ ते ६५ वयोगटात होणार चाचणी
उपलब्ध माहितीनुसार, ‘हेटेरोजिनस बूस्टर ट्रायल’ची चाचणी १८ ते ६५ वयोगटात होणार आहे. देशात ही चाचणी दिल्ली एम्ससह नागपुरातील गिल्लीरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, तेलंगणा, हरियाणा, लखनौ, हैदराबाद, उत्तरांचल, कर्नाटक व ओडिशा अशा नऊ ठिकाणी होईल. एका केंद्रावर जवळपास ६७ ते ६८ असे एकूण ६०८ स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाईल.
- चार भागांत विभागण्यात आली चाचणी
ही चाचणी चार भागांत विभागण्यात आली. पहिल्या भागात ज्यांचे दोन्ही डोस कोव्हॅक्सिनचे घेतले त्यांना याच लसीचा ‘नेझल’ म्हणजे नाकावाटे बूस्टर डोस दिला जाईल, दुसऱ्या भागात ज्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले त्यांना याच लसीचा ‘इन्ट्रामस्क्युलर’ बूस्टर डोस दिला जाईल. तिसऱ्या भागात ज्यांनी दोन्ही डोस कोव्हॅक्सिन घेतले त्यांना कोविशिल्डचा ‘इन्ट्रामस्क्युलर’चा डोस तर ज्यांनी दोन्ही डोस कोविशिल्डचे घेतले त्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा ‘इन्ट्रामस्क्युलर’ बूस्टर डोस देण्यात येईल. ही चाचणी नऊ महिने चालणार आहे.