आता काँग्रेसही काढणार ‘रथयात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:55 AM2018-10-03T09:55:32+5:302018-10-03T09:57:23+5:30

माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेनंतर तर देशाच्या राजकारणाचे चित्रच बदलून गेले होते. आता भाजपाप्रमाणेच कॉंग्रेसदेखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रथयात्रेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे.

Now Congress will run 'Rath Yatra' | आता काँग्रेसही काढणार ‘रथयात्रा’

आता काँग्रेसही काढणार ‘रथयात्रा’

Next
ठळक मुद्दे१ जानेवारीपासून करणार सुरुवातभाजपाविरोधात करणार वातावरण निर्मिती

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी ‘रथयात्रा’ म्हटले की राजकीय वर्तुळात डोळ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे नाव येते. माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेनंतर तर देशाच्या राजकारणाचे चित्रच बदलून गेले होते. आता भाजपाप्रमाणेच कॉंग्रेसदेखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रथयात्रेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाविरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी २०१९ च्या पहिल्या दिवसापासून नागपुरात कॉंग्रेसतर्फे रथयात्रा काढण्यात येणार आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे ‘बूथविस्तारक’, ‘पेजप्रमुख’, ‘शक्तीप्रमुख’ इत्यादी मोहीम राबविण्यात आल्या. या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष गृहसंपर्क व संघटन मजबुतीवर भर दिला. दुसरीकडे अंतर्गत गटबाजीतच कॉंग्रेसचे नेते अडकून राहिले होते.
मात्र सेवाग्राम येथे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात ऊर्जा संचारल्याचे दिसून येत आहे. निवडणुका जवळ येत असताना ही ऊर्जा टिकवून ठेवून जनतेपर्यंत जाण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन कॉंग्रेसने पुढील योजनांची रुपरेषा तयार केली आहे. भाजपच्या शासनकाळातील गैरव्यवहार, विविध कामांमधील अनियमितता, आश्वासनांची न झालेली पूर्तता, शेतकरी समस्या, तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, जनतेमध्ये असलेली नाराजी इत्यादी बाबी जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी कॉंग्रेसने रथयात्रेचाच आधार घेण्याचे ठरविले आहे. याबाबत नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

४५ दिवस चालणार रथयात्रा
१ जानेवारी २०१९ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शहरात ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्र, प्रभागातून ही रथयात्रा काढण्यात येईल. या कालावधीत पथनाट्य, पत्रके यामाध्यमातून केंद्र व राज्य शासनाविरोधात प्रचार करण्यात येईल. गृहसंपर्कावर आमचा जास्तीत जास्त भर असेल आणि सरकारच्या आश्वासनांमधील फोलपणा आम्ही पुराव्यांसह जनतेसमोर मांडू, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘रथयात्रा’ काढण्यामागे कुणाची ‘कॉपी’ करणे हा उद्देश नाही. मात्र जनता रथयात्रेशी जुळली जाते. या प्रकारे जनतेमध्ये जाण्याचा कुठल्याही पक्षाकडे ‘कॉपीराईट’ नाही. आम्ही आमची मते यामाध्यमातून प्रभावीपणे जनतेसमोर मांडू, असेदेखील त्यांनी सांगितले.

राज्यासाठी आवश्यकतेनुसार विचार करू : राधाकृष्ण विखे पाटील
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर शहरातील रथयात्रा ही मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तूर्तास राज्यात रथयात्रा काढण्याचा आमचा विचार नाही. राज्यात आम्ही जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात आहोतच. याचे सर्व टप्पे समाप्त झाल्यानंतर राज्यात अशाप्रकारे रथयात्रा काढावी का याबाबत कार्यकारिणीत विचार करू, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Now Congress will run 'Rath Yatra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.