लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जो समाज आपल्या भाषेचा आदर बाळगत नाही, तिच्यावर प्रेम करीत नाही तो समाज व त्याची संस्कृती कालांतराने नष्ट होते. दुर्दैवाने मराठी भाषिक समाजामध्ये हेच चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेबद्दलची प्रचंड अनास्था महाराष्ट्रातील मराठी भाषकांमध्ये आहे. ही अनास्था उच्चवर्णीय, उच्च मध्य वर्गीय आणि मध्य वर्गीयांमध्येच अधिक आहे, असे परखड मत ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केले.मराठी व्याकरण तज्ज्ञ दिवाकर मोहनी व त्यांच्या पत्नी सुनंदा मोहनी यांनी देवनागरीलिपी, तिची वर्णमाला, तिच्यातील जोडाक्षरांची रचना, मराठी भाषेतील संधीनियम, तसेच आपल्या भाषेतील अक्षरगणवृत्ते समजण्यास सुलभ व्हावे यासाठी तयार केलेले व्हिडिओज यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहेत. त्यांच्या ‘नागरीलिपी’ या यू-ट्यूब चॅनलच्या लोकार्पणप्रसंगी एलकुंचवार बोलत होते. याप्रसंगी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी व ज्येष्ठ कवयित्री लीना रस्तोगी प्रामुख्याने उपस्थित होते. एलकुंचवार यांनी अत्यंत खुमासदारपणे विविध उदाहरणे देत मराठी भाषेची कशी मोडतोड होत आहे, हे सांगत अंतर्मुख केले. भाषा ही अहोरात्र डोळ्यात पाणी घालून जपावी लागते. मात्र महाराष्ट्रातील लोकांना भाषा शुद्ध स्वरूपात बोलणे आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी महत्त्वाचे आहे, असे वाटतच नाही. अशुद्ध बोलणे असंस्कृतपणाचे आहे, असे वाटत नाही. ग्रामीण बोलींसाठी हा नियम लागू होत नाही कारण त्यांची बोली ही शुद्ध आहे, मात्र प्रमाण भाषेविषयी ही आस्था निर्माण झाली पाहीजे. यापेक्षा परदेशी माणसे आपली भाषा एकाग्रपणे शिकतात. भारतीय लोकांना आपण बोलतो हे उत्तमच आहे, असे वाटते. उच्चवर्गीयांमध्ये तर आपण बोलतो तेच बरोबर असा अविचारी, अविवेकी दर्प निर्माण झाला आहे. मोठमोठे लेखक, मराठीचे प्राध्यापक बेधडकपणे अशुद्ध मराठीचा वापर करतात, हे त्यांनी उदाहरणासकट सांगितले. याउलट परदेशी माणसे आपल्या भाषांवर संशोधन करायला लागले आहेत. त्यामुळे आपलीच भाषा शिकायला परदेशात जावे लागण्याची वेळ पुढच्या पिढ्यांवर येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.यावेळी श्रीनिवास वरखेडी यांनी दिवाकर मोहनी यांची प्रशंसा करीत मराठी भाषेसाठी त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या उपासनेनंतर मूलभूत स्वरूपाचे काम पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली. दिवाकर मोहनी यांनीही त्यांचे मनोगत मांडले. संचालन प्राजक्ता अतुल यांनी केले.
येऊ द्या ना मुलांवर ताणसर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली. आता मराठी ऐच्छिक राहणार नाही, याचे स्वागत महेश एलकुंचवार यांनी केले. एक आणखी विषय शिकावा लागल्याने मुलांवर ताण पडेल, असे म्हणणाऱ्यांचाही त्यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. आजची मुले हुशार आहेत व त्यांच्यावर ताण पडणार नाही. आणि ताण आला तर येऊ द्या ना. आम्ही हा ताण घेऊन, रट्टे खाऊनच शिकलो आहोत. एवढी काय चिंता करायची, असा सवाल त्यांनी केला. दिवाकर मोहनी यांनी मूलभूत स्वरुपाचे कार्य केले असून त्यांचे व्हिडिओज शाळांमध्ये शिकविण्यासाठी वापरले जावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाला एलकुंचवार यांनी केले.