लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वाईन फ्लूची दहशत वाढतच चालली आहे. नागपूर विभागात जानेवारी ते आतापर्यंत २२४ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस या आजाराचा विळखा घट्ट होत आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टरांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्याचा विसर पडला आहे. गुरुवारी एक निवासी डॉक्टर ‘पॉझिटीव्ह’ आल्याने खळबळ उडाली. या पूर्वीही सहा डॉक्टरांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली होती, परंतु त्यानंतरही लस देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती आहे.‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात नागपूर शहरात १०७ रुग्ण आढळून आले. मार्च महिन्यात आतापर्यंत ४६ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या १५३वर पोहचली आहे. नागपूर ग्रामीण भागातही आठ रुग्ण आढळून आले आहेत. या शिवाय विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पाच, गोंदिया जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात तीन, गडचिरोली जिल्ह्यात एक, चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती जिल्ह्यात १९, अकोला जिल्ह्यात एक, यवतमाळ जिल्ह्यात एक असे एकूण २१ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. तर मध्यप्रदेशातील २२ व पश्चिम बंगालमधील एक रुग्ण असे एकूण २२४ रुग्णांची नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांचा भार शासकीय रुग्णालयांमध्ये एकट्या मेडिकलवर आहे. सध्या मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूचे चार रुग्ण उपचार घेत असून रोज १०वर संशयित रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. निवासी डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून या रुग्णांवर उपचार करीत आहे. परंतु डॉक्टरांना प्रतिबंधक लस देण्याकडे संबंधित विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. साधारणपणे ही लस जुलै ते आॅगस्ट महिन्यात देणे आवश्यक होते. परंतु आता मार्च उजाडला तरी लस उपलब्ध करून देण्यात आली नाही. सूत्रानुसार, या लसीची मागणी संबंधित विभागाने मेडिकल प्रशासनाकडे करायला हवी होती, परंतु कुणीच पुढाकार घेतला नसल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाच जीव धोक्यात आला आहे.डॉक्टरची प्रकृती स्थिरमेडिकलने काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लू संशयित नऊ रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. याचा अहवाल गुरुवार १४ मार्च रोजी प्राप्त झाला. यात दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले. यात मेडिसीन विभागातील एक निवासी डॉक्टर आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.