नागपूर : कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आता नियमितपणे होऊ लागला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनासोबतच आता टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यावरही जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी राज्य शासनाकडे तशी मागणीही केली.
रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली. यात यावर चर्चा झाली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यावेळी उपस्थित होते. एका खासगी कंपनीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यात ऑक्सिजनपुरवठा योग्यरीत्या होत असला तरी अधिकच्या तरतुदीसाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, असाही त्यांनी आदेश दिला.
संपूर्ण राज्यासाठी ८०० टॉसिलीझुमॅब इंजेक्शन केंद्राकडून येतात. बाधितांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. गेल्या ५ मे रोजी १०५ व त्यापूर्वी २९ एप्रिल रोजी टॉसिलीझुमॅब इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त झाले होते. या इंजेक्शनसाठी वाढीव मागणी सिप्ला कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे.