निशांत वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शेतातील संत्र्याचे वर्गीकरण किंवा ग्रेडिंग करणे, ही शेतकऱ्यांसाठी अडचणीची गाेष्ट असते. ग्रेडिंग केले नसेल तर भाव मिळत नाही आणि ग्रेडिंग करायला न्यायचे म्हटले तर वाहतूक खर्चाचा भुर्दंड बसताे. मात्र यापुढे संत्रा उत्पादकांना हा मन:स्ताप सहन करावा लागणार नाही. वर्ध्याच्या ‘एम-गिरी’ या संस्थेने साैरऊर्जेवर चालणारी मशीन तयार केली आहे, जी प्रत्यक्ष शेतात नेऊन संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग करता येईल.
महात्मा गांधी ग्रामीण उद्याेग संशाेधन संस्था (एम-गिरी) चे संचालक डाॅ. आशुतोष मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात कृषी अभियंता डाॅ. गणेश थेरे यांच्या टीमने ही मशिन तयार केली आहे. काेराेना महामारीच्या आधी शेतकऱ्यांनी या समस्येबाबत सांगितले हाेते. त्यानुसार संस्थेने संशाेधन सुरू केले हाेते. त्यानुसार एक माेठी मशीन तयार करण्यात आली. यामध्ये ४० मि.मी. ते ९० मि.मी. अशा ६ आकाराच्या संत्र्याचे ग्रेडिंग करणे शक्य झाले. साैरऊर्जेवर चालणाऱ्या या मशीनवर ट्रायल करण्यात आली तेव्हा ८ तासांत अडीच ते ३ टन संत्र्याचे ग्रेडिंग शक्य झाले.
मात्र ही मशीन एका जागेवरून हलविता येत नसल्याने वाहतुकीची अडचण हाेतीच. त्यामुळे संस्थेने पुन्हा लहान आकाराची मशीन तयार केली. ही मशिन एका छाेट्या टेम्पाेवर सहज असेंबल करून एका जागेवरून दुसरीकडे ने-आण करता येते. केवळ ३० हजार रुपयांच्या अल्प खर्चात ही मशीन तयार झाली असून तेवढ्याच किमतीत शेतकऱ्यांना घेता येईल, अशी माहिती डाॅ. थेरे यांनी दिली.
का गरजेची आहे ग्रेडिंग?
ग्रेडिंग केले नसेल तर लहान संत्रे पाहून ग्राहक नापसंती दर्शवितात. व्यापारीही भाव कमी करून मागतात. ग्रेडिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना संत्रा ग्रेडिंग सेंटरवर न्यावा लागताे. त्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढताे. ग्रेडिंग सेंटरवरून पुन्हा मार्केटमध्ये नेण्याचा खर्चही लागताे. लहान आकाराचा संत्रा पुन्हा परत आणावा लागताे.
या मशीनचे फायदे
शेतातच ग्रेडिंग करता येईल. माेठ्या आकाराचे व लहान आकाराच्या संत्र्यांना प्रक्रिया उद्याेगांना देता येईल. संत्रे ज्यूस व्यापाऱ्यांना पुरवता येईल. शहरी ग्राहकांना माेठा संत्रा आवडताे. सारख्या आकाराचा संत्र्याला भाव चांगला मिळताे.