लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कडक इस्त्रीचे कपडे अन् पँटच्या हुकला, कंबरेला खोचलेली पिस्टल अलीकडे अनेक जणांकडे बघायला मिळतात. या व्यक्ती पोलीस दलात किंवा लष्करात नाहीत. तरी याच्याकडे पिस्तूल कसे, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. मात्र, उत्तर शोधण्यासाठी जास्त डोके खपवण्याची गरज नाही. अलीकडे असे पिस्तूल, रिव्हॉल्वर (अग्निशस्त्र) बाळगण्याची फॅशन झाली आहे.
आपल्याजवळ पिस्तूल असले की समोरची मंडळी लगेच प्रभावित होतात, असा अनेकांचा (गैर)समज आहे. त्यामुळे शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अनेक जण धावपळ करताना दिसतात.
प्रारंभी महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपैकी (मंत्री, खासदार, आमदार) यांच्याचकडे परवानाप्राप्त शस्त्रे असायची. आता परवानाप्राप्त शस्त्र बाळगण्याची जणू फॅशनच झाली आहे. त्यामुळे अनेक जण शस्त्राचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोनशेपेक्षा जास्त व्यक्तींनी शस्त्राचा परवाना मिळावा म्हणून अर्ज केलेले आहेत. त्यातून याची प्रचिती यावी.
---
शस्त्र परवाना काढायचा कसा?
जिल्हाधिकारी कार्यालयात नमूद अर्जात आपली माहिती भरून देऊन शस्त्र परवाना मिळवता येतो. त्यासाठी तुमची आर्थिक अवस्था कशी आहे, सामाजिक स्थान काय, तसेच तुम्हाला शस्त्र परवाना कोणत्या कारणामुळे आवश्यक आहे, ते अर्जात नमूद करावे लागते. चारित्र्याचे प्रमाणपत्र आणि शस्त्र हाताळणीच्या अनुभवाचेही प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. अर्जदार ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो, तेथून त्याची पडताळणी होते. त्यातून त्या व्यक्तीला शस्त्र परवान्याची आवश्यकता असल्याची खात्री पटल्यास आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा शेरा अनुकूल असल्यास संबंधित व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जातो.
---
गैरवापर झाल्यास चुकवावी लागते मोठी किंमत
ज्यांची मोठी आर्थिक उलाढाल आहे. किंवा ज्यांचे समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान असून त्यामुळे समाजकंटकांकडून त्यांना धोका होऊ शकतो, हे ध्यानात घेत प्रशासनाकडून त्या व्यक्तींना शस्त्र परवाना दिला जातो. आणीबाणीच्या वेळी स्वत:च्या जानमालाचे रक्षण करता यावे, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो आणि म्हणूनच संबंधित व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जातो. त्याचा गैरवापर झाल्यास किंवा हे शस्त्र दुसऱ्याच कुण्या व्यक्तीने वापरल्याचे लक्षात आल्यास परवानाधारकाला ते चांगलेच महागात पडू शकते.
---
जिल्ह्यातील एकूण शस्त्र परवाने - १२०
- खासगी - ९४
(पिस्टल, रिव्हॉल्वर)
---
-संस्था (बँक, वेकोली आदी)- २६
(दुनाली बंदूक)
---