नागपूर : दोन आठवड्यांपूर्वी मेडिकलमधील एका ब्रदर्सला मारहाण, दोन दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर घाणरेडे शेरेबाजी केल्याने संतप्त निवासी डॉक्टरांनी एका इंजिनिअरला दिलेला चोप तर गुरुवारी लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी महिला डॉक्टरला छेडखानी केल्याचे प्रकरण समोर आले. यामुळे मेडिकलमध्ये सुरू काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शस्त्रक्रियागृहाच्या आत जाताना हटकले का म्हणून शस्त्रक्रियेचे साहित्य पुरवठा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ‘ब्रदर्स’ला मारहाण करण्याची घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेच्या विरोधात परिचारिकांनी संपाचे हत्यार उपसताच मेडिकल प्रशासनाने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु नंतर दोन्ही बाजूने समेट घडवून आणल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली. या प्रकरणाला दोन आठवडे होत नाही तोच २४ ऑगस्ट रोजी मेडिकलमधील ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टीम’च्या (एचआयएमएस) इंजिनिअरने एका महिला निवासी डॉक्टरवर घाणेरडे शेरबाजी करण्याचे प्रकरण पुढे आले. यामुळे चिडून निवासी डॉक्टरांनी इंजिनिअरला चांगलाच चोप दिला; परंतु दोन्हीकडून अद्याप कुठलीही तक्रार झाली नाही. मात्र अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. हे प्रकरण शांत होत नाही तोच आज एका महिला डॉक्टरने छेडखानीचा आरोप करीत एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून सुरक्षा रक्षकाच्या स्वाधीन केले.
प्राप्त माहितीनुसार, ही महिला डॉक्टर ‘जेआर-१’ असून फिजिओथेरपी विभागात कार्यरत आहे. मेडिकलच्या परिसरात ‘ग्लोबल सर्व्हिसेस’ या खासगी कंपनीकडून लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारला जात आहे. येथील दोन ते तीन कर्मचारी मागील काही दिवसांपासून या महिला डॉक्टरचा पाठलाग करीत होते. सुरुवातीला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले. आज दुपारच्या सुमारास संबंधित महिला डॉक्टर या प्लांट समोरून जात असताना या कर्मचाऱ्यानी पाठलाग करून छेडखानी केली. यामुळे घाबरलेल्या महिला डॉक्टरने महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाला याची माहिती दिली. त्यांनी लागलीच दोघांना पकडून वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. लांजेवार यांच्यासमोर उभे केले. त्यांनी संबंधित कंपनीला पत्र देऊन कर्मचाऱ्यांना तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले; परंतु या प्रकरणामुळे निवासी डॉक्टरांमध्ये पुन्हा एकदा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.