नागपूर : म्युकरमायकोसिसमुळे चिंतेचे वातावरण असताना आता कानांना बुरशीजन्य आणि बॅक्टेरिया संसर्गाच्या तक्रारी वाढल्या आहेत. कानाचा संसर्ग टाळण्यासाठी, आपले कान स्वच्छ व कोरडे ठेवा. कानाचे दुखणे, ऐकायला कमी येणे, कानातून पाणी येणे यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला कान, नाक व घसा तज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाळ्यात कानाचा संसर्ग होणे ही सामान्य घटना आहे. हा संसर्ग कानाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. कानाच्या आत आणि बाहेर सुद्धा जंतूसंसर्ग होऊ शकतो. अंघोळ करताना किंवा पावसाचे पाणी कानात साचून राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे वातावरणात वाढलेली आर्द्रताही बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. शिवाय कानातील मळ आणि इअरबड्सच्या वापरामुळे झालेली किरकोळ जखम देखील कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-ही आहेत लक्षणे
सतत अस्वस्थ वाटणे, कानात काही घालण्याची इच्छा होणे, चिडचिड होणे, खाज सुटणे, कानदुखी, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानातून पाणी येणे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि अगदी ताप यासारखे लक्षणे दिसू शकतात.
-म्युकरमायकोसिसच्या भीतीमुळे रुग्णांत वाढ
‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे, काळी बुरशीच्या भीतीमुळे कानाची समस्या उद्भवताच रुग्ण उपचारासाठी येत आहेत. परिणामी, रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कानाच्या संसर्गाचा उपचार म्हणजे कान स्वच्छ करणे, त्यासाठी डॉक्टरांची भेट घेऊन आवश्यक ते उपचार घेणे गरजेचे आहे.
-अशी घ्या काळजी
कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवा. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करा. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करा. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नका. कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येत असल्यास डॉक्टरांना भेटा.
-सामान्य आजार असला तरी दुर्लक्ष नको ()
पावसाळ्यात कानात बुरशी आणि जंतूसंसर्गाचे रुग्ण दिसून येतात. कोरोनामुळे आरोग्याला घेऊन सतर्कता बाळगली जात असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. हा सामान्य आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या उपचारात ‘टॅबलेट’ कामी पडत नाही. कानात टाकणारी औषधे व कान साफ करण्याची ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते, अन्यथा कानाच्या ‘एअर ड्रम’ला छिद्र पडण्याचा धोका असतो.
-डॉ. समीर चौधरी, वरिष्ठ ईएनटी तज्ज्ञ