नागपूर : नाकावाटे घेता येईल, अशा कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी देशात पहिल्यांदाच चार ठिकाणी सुरू झाली. यात राज्यातून नागपूरचा गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. भारत बायोटेक कंपनीची नाकावाटे देणारी कोव्हॅक्सिनची ही लस थेट फुप्फुसापर्यंत पोहचते. यामुळे अधिक चांगल्याप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा दावा केला जात आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून, सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ व भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जात आहे. या टप्प्यात ज्येष्ठांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सर्वच लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. भारतात तयार झालेली ‘कोव्हॅक्सिन’ही पहिली स्वदेशी लस आहे. हीच लस आता नाकावाटे देण्याची चाचणी जगात पहिल्यांदाच होऊ घातली आहे. प्राप्त माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे अस्थमासारख्या उपचार पद्धतीने म्हणजे थेट नाकावाटे लस फुफ्फुसात सोडली गेली तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. ‘इन्ट्रा व्हॅस्क्युलर’च्या तुलनेत नाकावाटे देण्यात आलेल्या लसीमुळे अॅण्टिबॉडीज जास्त पटीने तयार होतात, असे संशोधनातून सामोर आले आहे.
- ५० स्वयंसेवकांना लस
नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमुळे सिरिंज व इतर साहित्याचा खर्च कमी होतो. ही लस देणे सहज सोपे आहे. यामुळे लसीकरणात याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या नागपूर, हैदराबाद, भुवनेश्वर व पाटणा या केंद्रात मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ स्वयंसेवकांवर ही चाचणी होईल. नागपूर सेंटरवर यातील ५० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. १८ ते ५५ वयोगटात ही चाचणी दोन टप्प्यात होणार आहे.