नागपूर : डिसेंबर संपायला आणि नवीन वर्ष सुरू व्हायला आता जेमतेम चार दिवस उरले असतानाही विदर्भात डिसेंबरच्या मागमूस दिसेना झाला आहे. ९ व १० डिसेंबरला लागलेली कडाक्याची थंडी नंतर मात्र गायब झाली. आता तर दिवस आणि रात्रीच्याही पाऱ्याने उसळी घेतल्याचे चित्र आहे. संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने किमान तापमान वाढले आहे.
साेमवारी नागपुरात १५.३ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा २.६ अंशाने अधिक आहे. इतर शहरातही पारा चांगलाच वाढला आहे. चंद्रपूर आणि अकाेल्यात १७.४ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ४.२ अंश व ३.९ अंश अधिक आहे. याशिवाय रात्रीचे तापमान गाेंदियात १५.२ अंश, वर्धा १६.५ अंश, अमरावती १६ अंश, यवतमाळ येथे १६.५ अंश नाेंदविण्यात आले. गडचिराेलीत सर्वांत कमी १३.४ अंश किमान तापमान नाेंदविले गेले. दिवसाचे कमाल तापमानही २ ते ४ अंशाने वाढलेले आहे. नागपूरला ३०.४ अंश, अकाेला ३३.३ अंश, अमरावती ३२.८ अंश, वर्धा ३१.४ अंश व इतर शहरांत ३० अंशांच्या वर गेले आहे. पारा उसळलेली स्थिती २९ डिसेंबरपर्यंत राहणार असून, त्यानंतर घसरण सुरू हाेण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी अनुभवायला विदर्भवासीयांना नवीन वर्षाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, काेमरिन एरियात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व आसपास सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असून, ते पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे वळत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रापर्यंत पाेहोचणार आहे. त्यामुळे काहीसे ढगाळ वातावरण तयार हाेण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता पश्चिम महाराष्ट्रात मात्र तापमान घसरल्याची माहिती आहे. उत्तर व पूर्वाेत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा व धुक्यांचा प्रभाव विदर्भावर दिसून येत नसल्याची स्थिती आहे.