लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेतून ११ सदस्य निवृत्त होत असून या सर्वांनी बुधवारी आपल्या भावना सभागृहासमोर मांडल्या. माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, संजय दत्त, अमरसिंह पंडित, अॅड.जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील हे वगळता इतर सदस्य सभागृहात परत येणार आहेत. या सर्वच सदस्यांनी सभागृहातील आपल्या कारकिर्दीतील आठवणींंना उजाळा दिला व सभागृह भावूक झाले. आता या विधिमंडळात परत येणे नाही, हे सुनील तटकरे यांचे शब्द तर उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेले.म्हणून उपसभापतींच्या खुर्चीवर बसलो नाही : ठाकरेमाझ्या आयुष्यातील ३७ वर्षांचा कालावधी जनप्रतिनिधी म्हणून गेला. सुरुवातीच्या काळात जवाहरलाल दर्डा, गुलामनबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांमुळे मी २८ व्या वर्षी विधानसभेवर निवडून आलो. आयुष्यात मी शरद पवारांकडून बरेच काही शिकलो. सर्वांच्या प्रेमातून मी या पदावर पोहोचू शकलो. मी उपसभापती या आसनावर का बसलो नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र निरोप घेताना सदस्य म्हणूनच निरोप घेण्याचा मानस होता. पक्षाचा सदस्य उपसभापती होत असेल तर मी आड येऊ नये म्हणून मी आपला राजीनामा सुपूर्द केला, अशी भावना माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.सभागृहानेच मला घडविले : तटकरेतालुका कॉंग्रेस कमिटीचा सरचिटणीस ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस हा ३४ वर्षांचा प्रवास बराच काही शिकविणारा ठरला. आयुष्यातील अनेक घडामोडी अंत:करणात जाऊन भिडल्या. शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यासह सभागृहातीन नेत्यांनी मला घडविले. विधान परिषदेत मला सर्वार्थाने पोटतिडकीने बोलण्याची संधी मिळाली. माझ्या वडिलांना कधीच आमदार होता आले नाही. मात्र आमच्या कुटुंबातील चार सदस्य आठ दिवस आमदार होते. त्यांच्याच आशीर्वादाने यश मिळत गेले. इतर सदस्यांसोबत मैत्रीचे नाते कायम रहावे, असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.पक्षनिष्ठा हीच माझी शिदोरी : संजय दत्तमाझ्यासारखा साधा कार्यकर्ता आमदार होतो ही खरी देशाची लोकशाही आहे. पक्षाने माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला. पक्षनिष्ठा हीच माझी शिदोरी आहे. पक्षासाठी काहीही त्याग करण्याची तयारी आहे. मराठीतच कामकाजावर मी नेहमी भर दिला. वाचनालयाचा मी जास्तीत जास्त उपयोग केला. विधिमंडळ माझ्यासाठी मंदिरच आहे व याच भावनेने मी कार्य केले. सभागृहातील वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकाºयांचे प्रेम कायम रहावे हीच अपेक्षा, असे प्रतिपादन संजय दत्त यांनी केले.कृषी हाच माझा विचारांचा गाभा : अमरसिंह पंडितमुंडे यांच्या आग्रहाखातर मी भाजपात आलो व २००४ साली आमदार झालो. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मला खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मराठवाडा, पाणी, शेती हे विषय माझ्या अंत:करणाशी जोडल्या गेले आहे. कृषी हा माझ्या राजकारणाचा गाभा आहे. स्थलांतरित लोकांचे प्रश्न मांडताना मी अनेकदा आक्रमक झालो. पण मी माझे मुद्दे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सभागृहाने मला मौलिक शिदोरी दिली आहे, असे मत अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केले.माथाडी चळवळीसाठी समर्पित : नरेंद्र पाटीलवडिलांना जवळून पाहता आले नाही. मात्र कामगार हिताचे त्यांच्या विचारांची प्रत्यक्ष कार्य करताना वेळोवेळी प्रचिती येत गेली. विविध नेत्यांनी वेळोवेळी आधार दिला. माथाडी चळवळ कायम राहणे आवश्यक आहे. मात्र काही नेत्यांनी माथाडींना न्याय देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाही. माथाडी क्षेत्राशी संबंधित काही लहान प्रश्न मोठे होत गेले, असे बोलताना नरेंद्र पाटील यांना अश्रू आवरले नाहीत.बाबासाहेबांच्या विचारांचा आधार : जयदेव गायकवाडडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच माझ्या जीवनाचा आधार राहिले आहे. त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालल्यामुळेच मला विधिमंडळात येण्याची संधी मिळाली. शरद पवार, अजित पवार यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. सभागृहाने मला बरेच काही शिकविले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वंचितांचे प्रश्न उपस्थित करण्याची मला माझ्या कार्यकाळात संधी मिळाली, असे अॅड.जयदेव गायकवाड यांनी प्रतिपादन केले.