योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने नवमतदारांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे. विशेष म्हणजे संबंधित नेते हे ४५ वर्षे वयाच्या खालीलच असावे असा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूकांच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या माध्यमातून पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत नेण्यात व मतदारांना पक्षाशी जोडण्यात यश आले होते.महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकूण ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार आहेत. यातील नवमतदारांची संख्या ही २१ लाखांहून जास्त आहे. नवमतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत व विविध उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. याच साखळीत ‘भाजयुमो’कडून ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केवळ नवमतदारांसाठीच असेल. तेथे भाजपचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते त्यांच्याशी संवाद साधतील. त्यांच्या विकासाच्या कल्पना, भाजपबद्दलचे मत जाणून घेतील, अशी माहिती ‘भाजयुमो’चे प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांनी दिली. ‘कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात राष्ट्रीय व राज्य पातळीवर नावाजलेले तरुण नेते सहभागी व्हावेत असा ‘भाजयुमो’चा प्रयत्न आहेत. याअंतर्गत काही नावे अंतिम करण्यात आली आहे. यात बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या, मनोज तिवारी, पूनम महाजन, सुजय विखे पाटील, गौतम गंभीर इत्यादी नेते तरुणाईशी थेट संवाद साधण्याची शक्यता आहे. ते तरुणाईच्या प्रश्नांचीदेखील उत्तरे देतील. प्रत्येक जिल्ह्याच्या ऐतिहासिक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा ‘भाजयुमो’चा मानस होता. परंतु पावसाने अद्याप उसंत घेतली नसल्याने जिल्हानिहाय स्थिती पाहून स्थळ अंतिम करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
नवमतदारांना जोडण्यासाठी आता ‘भाजयुमो’ चे ‘कॉफी विथ यूथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 6:00 AM
नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे.
ठळक मुद्देराज्यभरात राबविणार उपक्रमभाजप नेते साधणार तरुणाईशी संवादया मुद्यांवर असेल भर कलम-३७०, ट्रीपल तलाकच्या निर्णयांबाबत तरुणाईचे मत भविष्यातील भारताच्या कल्पना देशातील नेतृत्व व सरकारच्या कामगिरीबाबत मत तरुणाईच्या अपेक्षा भाजपने तरुणाईसाठी उचललेली पावले