- आरोपी शिपायाचे निलंबन, १५ दिवसातील दुसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांतिनगर एसीपी कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांकडून दारू व मटनाची पार्टी आयोजित करण्यात आल्याचे प्रकरण निवळले नसतानाच एमआयडीसी एसीपी कार्यालयात गोंधळ उडाला आहे. येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने कार्यालयातच दारू पिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील मनोज ठाकूर नामक कर्मचाऱ्यास तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज ठाकूर जवळपास दीड वर्षापासून एमआयडीसी एसीपी कार्यालयात तैनात आहे. तो नेहमीच कार्यालय परिसरात मद्याचे घोट घेत होता. काही दिवसापूर्वी कार्यालयातच तो सफाई कर्मचारी व अन्य काही साथीदारांसोबत दारूची पार्टी उडवत होता. झिंग चढल्यावर ठाकूर व त्याच्या साथीदारांमध्ये कामाबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, ठाकूरने दारू पिण्याच्या क्षमतेबद्दल माहिती दिली. कुणीतरी या घटनेची क्लिपिंग बनविली आणि मंगळवारी याबाबत उच्च अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी ठाकूरला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आणि डीसीपी नुरुल हसन यांच्याकडे प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले. ठाकूर आधी एमआयडीसी ठाण्यात तैनात होता. तेथेही अनेक प्रकरणात तो चर्चेत होता. तेथेही एका प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही त्याची तैनाती एमआयडीसी एसीपी कार्यालयात होती, हे आश्चर्यकारक आहे. १५ दिवसापूर्वी शांतिनगर आणि आता एमआयडीसी एसीपी कार्यालयातील खरेपणा पुढे आल्याने, पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी अवांच्छित कृत्य करण्यासाठी कार्यालयाचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे.
.................