लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या पंंधरवड्यात तीनदा आढावा बैठक घेतली. यातील काही प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आता पुन्हा रविवारी २६ आॅगस्टला दुपारी १२ वाजता रामगिरी येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता केंद्रीय मंत्री शहरातील विकास प्रकल्पांना गती देण्याच्या प्रयत्नात आहेत.गडकरी यांनी १२ आॅगस्टला २५ विषयावर बैठक आयोजित केली होती. यात महापालिका, नासुप्र, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, मेट्रो रेल्वे विभागाशी संबंधित विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. त्यानतंर गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात २१ आॅगस्टला पुन्हा बैठक घेतली. त्यानंतर दिल्ली येथे नागनदी व ग्रीन बसच्या मुद्यावर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला फे ब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आठवडाभरात शहरात ग्रीन बस पुन्हा सुरू करण्यावर सहमती झाली.शहरातील विकास प्रकल्पांसदर्भात गडकरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेत आहेत. यात आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प मेट्रो रेल्वेकडे देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. तसेच जयस्तंभ चौक ते मानस चौक , नेताजी मार्केटच्या विकासाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे सोपविण्यात आली आहे. यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.या विषयावर होईल चर्चाबैठकीत आरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प मेट्रोमार्फत राबविण्याबाबत सहमती होण्याची शक्यता आहे. मागील बैठकीत गडकरी यांनी महापालिका व मेट्रो रेल्वेला करार करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मेट्रो रेल्वे , सदर येथील गोल बाजार, बर्डी येथील नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, यशवंत स्टेडियमचा विकास, जयस्तंभ चौक ते मानस चौक दरम्यानचा उड्डाण पूल तोडून केंद्रीय रस्ते निधीतून प्राप्त झालेल्या २३४ कोटींतून या भागातील रस्त्याचा विकास करण्यावर चर्चा होईल. तसेच अंबाझरी परिसर विकास, फुटाळा तलाव प्रकल्पाचे सादरीकरण होईल. अॅग्रो व्हीजन कन्व्हेन्शन सेंटर साठी जमीन हस्तांतरणाचे सादरीकरण तसेच मिहान येथील अतिरिक्त जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावर चर्चा होईल.