नागपूर : मल्टीमॉडेल पॅसेंजर व कार्गो हबसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ल्डक्लास करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार विमानतळाच्या जागेसह एकूण २६०० एकर जमीन जीएमआर कंपनीला मे महिन्यात होणाऱ्या भव्य सोहळ्यात हस्तांतरित करणार आहे. विमानतळावर होणाऱ्या विकास कामांमुळे नागपूरसह विदर्भाच्या आर्थिक विकासाला बळ मिळेल आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.
विमानतळाचा विकास दोन टप्प्यात होणार‘जीएमआर’ नागपूर विमानतळाचा विकास आठ वर्षांत दोन टप्प्यात करणार आहे. विमानतळाच्या हस्तांतरणानंतर प्रवाशांच्या सोयी आणि सुलभतेत वाढ करण्यासाठी टर्मिनल आणि संबंधित सुविधांच्या नूतनीकरणाचे काम तात्काळ हाती घेतले जाईल. मिहान इंडियाला सर्वाधिक महसूल देण्याची तयारी जीएमआरने दर्शवल्याने या प्रकल्पासाठी जीएमआरची निवड झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील विकास कामांमध्ये सध्याच्या ३२०० मीटर लांबीच्या धावपट्टीला समांतर ४ हजार मीटर लांब आणि ६० मीटर रूंद दुसरी धावपट्टी उभारण्यात येईल. आंतरराष्ट्रीयस्तराचे कार्गो टर्मिनल तसेच प्रवासी सुविधा राहतील. विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलमध्ये प्रवाशांची वार्षिक क्षमता ४ कोटी गृहित धरण्यात आली आहे. नवीन टर्मिनल इमारत शिवणगाव येथे ७५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार आहे. टॅक्सी-वे, अॅप्रोच रोड, पार्किंग आणि प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा यामध्ये उपलब्ध असतील.
२० हजार मेट्रिक टन क्षमतेचे कार्गो टर्मिनलविमानतळावर सद्यस्थितीत १७ विमाने उभी राहू शकतात. पुढील चार वर्षांत आणखी १६ प्रवासी व दोन कार्गो विमाने उभी राहू शकतील. लॉजिस्टिक्सला चालना देण्यासाठी २० हजार मेट्रिक टन कार्गो टर्मिनल उभारण्यात येईल. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांसह नवीन प्रवेश रस्ते, एअरसाइड सुविधा, पार्किंग, हॉटेल्स आणि बरेच काही राहील. सुधारित ऑपरेशन्ससाठी नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवर उभारण्यात येईल.