नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात आता जास्त रस राहिला नसल्याचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुुवया उंचावल्या आहेत. मी एकतर प्रेमाने काम करवून घेतो किंवा कठोर होतो. मी याअगोदरदेखील निवडणूक जिंकलो आहे. मात्र आता मी फार लोणी लावायला तयार नाही. लोकांना पटले तर त्यांनी मत द्यावे. मी नसेल तर कुणी नवीन येईल. पण मला आता समाजकारण व विकासाच्या कामांना जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरी म्हणाले. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
मला कुणी कुठे सोडायला आलेले आवडत नाही. तसेच मला हार घातले तर मी विचलित होतो. त्यामुळे सत्कार सोहळ्याला जाणे मला फारसे रुचत नाही. मी आजवर प्रचारासाठी कटआऊट लावले नाही व पुढेदेखील लावणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट शिकलो आहे की नवीन कल्पना प्रत्यक्षात आणायला वेळ लागतो. मी २००४ सालापासून इथेनॉलच्या गोष्टी करायचो व लोक प्रश्न निर्माण करायचे. आता याच इथेनॉलला लोकांनी स्वीकारले आहे. आपल्याकडील लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्व समजून घेत नाहीत, असेदेखील ते म्हणाले.
म्हणून मी डॉक्टर लावत नाही
मला आजवर सहा डी.लिट. मिळाल्या. पण मी नावासमोर डॉक्टर लावत नाही. मी थर्डक्लासमध्ये सिनेमा पाहणारा व फुटपाथवर खाणारा व्यक्ती आहे. मला बारावीला ५२ टक्के मिळाले होते व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. पण मला त्याचे शल्य नव्हते. मला प्रॅक्टिकल वागण्यात जास्त आनंद मिळायचा व आजदेखील मिळतो, असे गडकरी म्हणाले.