नागपूर : मेडिकलच्या परिसरात समाजविघातकांचा वाढता सुळसुळाट व वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी मेडिकल प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारातून रुग्ण, त्यांचे नातेवाईक व महाविद्यालयाचे काम असणाऱ्यांनाच आत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात केले आहे, ते चौकशी करूनच प्रवेश देत आहेत. यामुळे चोरीच्या घटना कमी झाल्या असून रुग्णांसह डॉक्टरांमध्येही सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
मेडिकलचा परिसर २६० एकरमध्ये पसरला आहे. रुग्णालयाची मुख्य व महाविद्यालयाची इमारत, दंत महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकाच परिसरात आहे. येथे आत येण्यासाठी पूर्वी पाचपेक्षा जास्त प्रवेशद्वार होते. रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचता यावे, ही त्यामागची भूमिका होती. परंतु दरम्यानच्या काळात परिसरात समाजविघातकांचा सुळसुळाट वाढल्याने येथील रुग्णांसोबतच डॉक्टर व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याचा त्रास होत होता. आजूबाजूच्या वसाहतीतील नागरिकांचा हा येण्या-जाण्याचा मार्ग झाला होता. रात्री, बे-रात्री हॉर्न वाजवून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास दिला जात होता. गर्ल्स हॉस्पिटलच्या समोर काही समाजविघातक उभे राहून अश्लील हातवारे करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या. यामुळे केवळ तीन मुख्य प्रवेशद्वार ठेवून, इतर सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. सध्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकलमधील ओपीडी व राजाबाक्षा भागातील प्रवेशद्वार सुरू ठेवले जातात. परंतु त्यानंतरही परिसरात वाहनांची वर्दळ व समाजविघातकांच्या घटनांना ऊत आला होता. निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या विषयी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे तक्रार केली. याची गंभीर दखल घेत ‘सुपर’च्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक बंद करण्यात आले. दुसऱ्या द्वारावर व मेडिकलच्या राजाबाक्षा भागातील प्रवेशद्वारावर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) जवान तैनात करण्यात आले. या दोन्ही प्रवेशद्वारांतून आत येणाऱ्यांची चौकशी करूनच त्यांना सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
-रुग्ण, नातेवाईक व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
रुग्णालयातील गर्दी कमी करून कोरोनाचे नियम पाळले जावे, सोबतच रुग्ण, त्यांचे नातेवाईक व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी गरजू लोकांनाच रुग्णालयात व महाविद्यालयाच्या आत प्रवेश देण्याच्या हेतूने प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या सूचनांनुसार ही मोहीम राबविली जात आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल