दयानंद पाईकराव
नागपूर : शासनाने एसटीच्या दीडपट भाडे वसूल करण्याची परवानगी ट्रॅव्हल्स संचालकांना दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ट्रॅव्हल्सचे भाडे आकाशाला भिडणार आहे. दिवाळीत प्रवास करणे म्हणजे प्रवाशांचा खिसा रिकामा होणार आहे. परंतु शासनानेच परवानगी दिल्यामुळे आता ट्रॅव्हल्सधारकही दिवाळीत पुरेपूर भाडे वसूल करणार असल्याची स्थिती आहे.
ट्रॅव्हल्सचे दिवाळीत असे राहणार दर
आधीचे दर दिवाळीतील स्थिती
नागपूर ते नांदेड ६०० १२००
नागपूर ते पुणे १२०० २९००
नागपूर ते धुळे १००० १४००
नागपूर ते औरंगाबाद ८०० १४००
नागपूर ते सोलापूर १००० १५००
१९ महिने झाले नुकसान
‘कोरोनामुळे १९ महिने ट्रॅव्हल्स बंद होत्या. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. हे नुकसान भरून निघावे यासाठी या वर्षीचा कर माफ करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. सध्या यात्रा सहली, पर्यटन बसेस आणि शाळेच्या सहली बंद असल्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांची आर्थिक स्थिती अद्यापही सुधारलेली नाही.’
- महेंद्र लुले, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेंपो, टँकर बस वाहतूक महासंघ
दिवाळीत प्रवास कठीण झाला
‘शासनाने एसटीच्या दीडपट अधिक प्रवासभाडे आकारण्याची परवानगी ट्रॅव्हल्स संचालकांना दिली आहे. त्यामुळे दिवाळीत मोठी भाडेवाढ होणार असून दिवाळीत प्रवास करणे कठीण होणार आहे.’
- राहुल गवई, प्रवासी
दिवाळीतील प्रवासभाड्यावर नियंत्रण हवे
‘दिवाळीचा सण अनेक जण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी आपापल्या गावी जातात. परंतु ट्रॅव्हल्सधारक मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करीत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडतो. त्यामुळे दिवाळीतील प्रवासभाड्यावर शासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.’
- भरत चव्हाण, प्रवासी
...............