सावनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत सावनेर विभागातील ग्राहकाला अवघ्या २४ तासांत वीज जोडणी देण्यात आली. १ एप्रिल २०२१ ते २४ ऑगस्ट २०२१ या दरम्यान नागपूर परिमंडळात अनुसूचित जातीच्या १६५२, तर अनुसूचित जमातीच्या ६४८ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली. जीवन प्रकाश योजना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त राज्यभरातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तीचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ असून, ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा असल्यास पुढील १५ दिवसांत वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक असून, ही रक्कम पाच समान मासिक हप्त्यात भरण्याची सुविधा अर्जदाराला राहणार आहे.
सावनेर विभाग अंतर्गत येणाऱ्या घोगली येथील आश्विन बाळा सोनारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अवघ्या २४ तासांत वीज पुरवठा मंजूर करून वीज जोडणी देण्यात आली. याप्रसंगी ग्राहकाचा महावितरणच्या वतीने सत्कारही करण्यात आला. यावेळी घोगलीच्या सरपंच कल्पना वानखेडे व इतर कर्मचारी उपस्थित होते .
नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंळालाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, खापरखेडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाले, सहायक अभियंता महादुला खवसे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी २४ तासांत वीज जोडणी देण्यासाठी सहकार्य केले.