लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : उशिरा का होईना उमरेड तालुक्यासाठी कोविड केअर सेंटरच्या उभारणीचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने आता या सेंटरमध्ये केवळ ऑक्सिजनचा पुरवठा झाला की शुक्रवार(दि.२३)ला केंद्राचे उद्घाटन, असे शेवटच्या टप्प्यातील नियोजन उरले आहे. एकदाचे सेंटर सुरू झाले की मग आरोग्य विभागाची खरी परीक्षा राहणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम् यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणा या सेंटरवर आपली जबाबदारी पार पाडणार आहे. एकूण ८० बेडच्या या कोविड सेंटरसाठी नूतन आदर्श महाविद्यालयाने आपली इमारत दिली. जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, मातोश्री प्रभादेवी सेवा संस्थेचे प्रमोद घरडे यांनी मदतीचा हात दिला.
तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीअंतर्गत नगरपालिका, महसूल विभाग, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी रात्रंदिवस एक करीत अगदी कमी कालावधीत उत्तम सेवा देता येणारे कोविड सेंटर उभारले आहे. या संपूर्ण आतापर्यंतच्या जबाबदारीची आणि कार्याची प्रशंसा सर्वत्र केली जात आहे. कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर योग्य सुविधा रुग्णांना मिळाल्यास नक्कीच शाबासकीची आणि अनेकांच्या आशीर्वादाची थाप मिळेल यात शंका नाही.
...
टीव्ही स्क्रीन
या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, परिचारिका, ऑक्सिजन या महत्त्वपूर्ण बाबींसह पाणी, विद्युत, कूलर, भोजन आदी सुविधांसह टीव्ही स्क्रीनचीसुद्धा व्यवस्था केल्या गेली आहे. सोबतच संपूर्ण हॉलमध्ये आल्हाददायक आनंदी वातावरणनिर्मिती कशी साधता येईल, याकडेही कटाक्षाने काळजी घेतल्या गेली आहे.
....
पडद्यामागचे हिरो
केवळ चार-पाच दिवसात उमरेडच्या या कोविड सेंटरच्या उभारणीसाठी अनेकांनी रात्रंदिवस एक करीत परिश्रम घेत जीव लावला. या उभारणीत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण टीम कामाला लागली. आपल्या गावातच ही व्यवस्था होत आहे. शिवाय, अनेक रुग्णांची गैरसोय आणि दयनीय अवस्था यामुळे काही प्रमाणात टाळता येईल, या उदात्त भावनेतून ज्याला जसे जमेल तशी सेवा प्रदान करण्याचे कार्य अनेकांनी केले आहे. यातूनच हे कोविड सेंटर उभे झाले आहे. कोविड सेंटरच्या उभारणीत आपला घाम गाळणारे पडद्यामागील काही हिरो आहेत. यामध्ये दिलीप चव्हाण, अनिल झोडे, अनिल येवले, वैभव भिसे, संदीप लांजेवार, नामदेव खवास, अजित रामटेके, राजू ढेबुदास आदींचे योगदान उल्लेखनीयच मानावे लागेल.