आॅनलाईन लोकमतनागपूर : डीटीएचप्रमाणे विजेमध्ये सुद्धा प्रिपेड सेवा उपलब्ध करून देण्यासंबंधात केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यामुळे वीजही रिचार्ज करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा व नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर के. सिंग (स्वतंत्र प्रभार) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.‘सौभाग्य योजने’चे राज्यस्तरीय उद्घाटन करण्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. आर. के. सिंग यांनी सांगितले की, टाटा स्कायमध्ये प्रिपेड सेवा उपलब्ध आहे. ज्याप्रमाणे बिल भरले नाही तर डीटीएचची सेवा आपोआप डिस्कनेक्ट होते आणि पैसे भरले की, ती पुन्हा आपोआप सुरू होते. त्याचप्रकारे सामान्य वीज ग्राहकांसाठीसुद्धा अशाच प्रकारची प्रिपेड सेवा उपलब्ध करून देण्यासंबंधात शासन गांभीर्याने विचार करीत आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जाईल. यात वीजही रिचार्ज करता येईल. ज्यांना जितकी वीज रिचार्ज करायची असेल ते तितकी वीज रिचार्ज करू शकतील. पैसे संपले की वीज डिस्कनेक्ट होईल. शुल्क भरले की पुन्हा सुरू होईल. यामुळे बिल रिडींग करण्याची, बिल पाठवण्याची आणि भरण्याची गरजच पडणार नाही, असेही आर. के. सिंग यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खा. कृपाल तुमाने उपस्थित होते.