लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी किरकोळ व घाऊक व्यापारक्षेत्राबाबत मोठी घोषणा केली आहे. हे व्यापार आता सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कक्षेत येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. एमएसएमईच्या बळकटीकरणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
किरकोळ व घाऊक व्यापार याअगोदर एमएसएमईच्या कक्षेत नव्हता. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना शासकीय तसेच विभागाच्या योजनांचे फायदे मिळत नव्हते. आता हे उद्योग एमएसएमईच्या कक्षेत आल्याने रिझर्व्ह बँकेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार नव्याने प्राधान्य देण्यात आलेल्या व्यापाराला कर्जाच्या नूतनीकरणाचा फायदाही मिळणार आहे. किरकोळ आणि घाऊक व्यापाराला देशातील अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळे सुमारे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना लाभ होईल, असे गडकरी यांनी सांगितले.