लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशनची चोरी रोखण्यासाठी बारकोडचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात प्रथम अशा प्रकारचा प्रयोग शहरात पहिल्यांदाच करण्यात येणार आहे.रेशनदुकानाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यात येतो. अनेकांनी बोगस रेशनकार्ड तयार केले असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने आधार लिंक करून बायोमॅट्रिक प्रणालीचा उपयोग केला. शासकीय धान्य गोदामातून ट्रकद्वारे रेशन दुकानात धान्य पोहोचविण्यात येते. ट्रक चालकाकडून याची चोरी करण्यात येते. काही ट्रक चालक तर गोदामातील माल थेट इतरत्र नेत असल्याचे प्रकार समोर आले आहे. यावर आळा घालण्यासाठी ट्रकला जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आता बारकोडचा उपयोगही करण्यात येणार आहे असे पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले, शहरात ६६५ रेशनदुकान आहेत. या दुकानांमध्ये ३४ ट्रकच्या माध्यमातून धान्य पोहोचविण्यात येते. एफसीआयच्या गोदामातून ट्रकमध्ये धान्य ‘लोड होताच त्याला एक पावती देण्यात येईल. या पावतीवर ‘बारकोड' राहील. रेशनदुकानात धान्य मिळताच पावतीवरील बारकोड स्कॅन करण्यात येईल. त्यामुळे त्या दुकानात नेमके किती धान्य मिळाले, याची माहिती मिळेल. यामुळे धान्य चोरीवर आळा बसणार असून लवकरच ही प्रणाली सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येणार आहे.