लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेने मतदान करीत सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदर ‘फॉर्म्युला’ बदलविण्यात आला असून, आता ग्रामपंचायत सदस्यच सरपंच ठरविणार आहेत. उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
१५ जानेवारी रोजी होत असलेल्या या निवडणुकीचे नियोजन आखले जात असून, प्रशासनसुद्धा सज्ज झाले आहे. तालुक्यातील चनोडा, बोरगाव (लांबट), खुर्सापार (बेला), सालईरानी, खैरी (चारगाव), कळमना (बेला), शेडेश्वर, किन्हाळा, सावंगी (खुर्द), खुर्सापार (उमरेड), शिरपूर, विरली, मटकाझरी आणि नवेगाव साधू याठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी गुलाबी थंडीत राजकीय पारा चढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.