आशीष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थी व पालकांसाठी एक आशादायक बातमी आहे. निकाल पाहण्यासाठी त्यांना आता शाळेत जाण्याची गरज नाही. त्याऐवजी पालकांच्या मोबाईलवर किंवा ई-मेलवर शाळेकडून निकाल पाठविले जाणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात तसे निर्देश दिले असून, यासाठी फॉर्म्युला तयार करून तो शाळांना पाठविला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाकडून आलेल्या आदेशानुसार मिळालेल्या प्रारूपानुसार निकालपत्रक तयार करण्यात शिक्षक गुंतले आहेत. प्रत्यक्षात या कामात त्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत. यासाठी त्यांनी शाळेतील प्राचार्यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे सहकार्याचीही मागणी केली आहे.शाळांना १० मेपर्यंत निकाल जाहीर करायचे आहेत. यंदा परीक्षा न झाल्याने निकालपत्र तयार करावे लागणार नाही, अशीच बहुतेक शिक्षकांची धारणा होती. मात्र आलेल्या आदेशामुळे आता त्यांची धावपळ उडाली आहे. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना प्रमोट करायचे आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भातील एक प्रारूप तयार करून पाठवले असले तरी प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी अद्याप अशा प्रकारचा फॉर्म्युला मिळालेला नाही. तर सीबीएससी अभ्यासक्रमसंबंधित शाळांच्या परीक्षा पूर्ण झाल्याने आता त्यानुसारच ते निकालपत्रक तयार करत आहेत. ज्या शाळांमध्ये परीक्षाच झालेल्या नाहीत, तिथे घटक चाचण्या किंवा तोंडी परीक्षेच्या आधारावर निकाल घोषित करण्यात आले आहेत.आता पालकांचे मोबाईल नंबर मिळविण्यासाठी धावाधावशिक्षण विभागाच्या आदेशानंतर आता शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी शोधण्याच्या कामी गुंतले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांना आपल्या स्तरावरच हे नंबर शोधावे लागत आहेत.असा आहे फॉर्म्युलाशिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार १३ मार्चपर्यंत झालेल्या प्रथम व द्वितीय सत्रातील मौखिक प्रात्यक्षिक प्रथम सत्र परीक्षेत १०० गुण तर अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० गुण द्यायचे आहेत. परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करायचे आहे.