भिवापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात आता लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अड्याळ येथील लसीकरण केंद्रावर अनेक ज्येष्ठ मंडळी व फ्रंटलाइन वर्करनी हजेरी लावत कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. मात्र याचवेळी दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला. कारण दुसऱ्या डोसची कालमर्यादा आता ४५ वरून ८४ दिवस झाल्यामुळे त्यांच्या नावाची ऑनलाइन नोंदणी होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अड्याळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. काही दिवसांपूर्वी लसीचा पहिला डोस घेतलेल्या एका पॉझिटिव्ह तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे या भागात लसीबाबत गैरसमज पसरले होते. त्यामुळे ज्येष्ठांसह वयोवृद्ध मंडळी लस घेण्याचे टाळत होते. त्यामुळे खुद्द तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर यांनी या गावांना भेटी देत, लसीकरणाबाबत जनजागृती केली. त्यानंतर आता येथे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या लसीकरण केंद्रावर प्रभारी तहसीलदार दिनेश पवार, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ. रोसीना मोहन्ना, सरपंच मंगला तांबे, ग्रामसेविका शालू प्रधान, पर्यवेक्षक भगवान भोगडे, शिक्षक मारोती पाणसे, अशोक तागडे, के. एम. राऊत, परिचारिका अरुणा लांडगे, शीला देशमुख, धनमाला वानखेडे, संध्या सोनटक्के, सुनीता येवले, ममता देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते. नागतरोली ग्रामपंचायतीच्या सभागृहात सोमवारी लसीकरण व कोविड तपासणी करण्यात आली. त्यासाठी आरोग्य सेवक संजय गव्हारे व गोविंदा नंदनवार यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
170521\img_20210515_121728.jpg
===Caption===
अड्याळ येथे महिलेला लस देतांना आरोग्य कर्मचारी