लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पी के’ या हिंदी चित्रपटातील डान्सिंग कारच्या धर्तीवर आता नागपुरातही हा प्रकार पाहायला मिळत आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी कारमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात आहे. असेच एक मोबाईल सेक्स रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील दोन युवकांना महाविद्यालयीन तरुणीद्वारे देहव्यापार करताना रंगेहात पकडले.योगेश शाहू (२३) रा. इंदिरानगर आणि राहुल गौतेल (२१) ठक्कर ग्राम अशी आरोपीची नावे आहे. देह व्यापाराबाबत पोलीस कारवाईने धास्तावलेल्या आरोपींनी कारमध्येच सेक्स रॅकेट चालवण्याची नवीन शक्कल चालवली होती. आरोपी हे विटा भट्टी परिसरात राहतात. देहव्यापाराच्या माध्यमातून पैसे कमावण्याची योजना त्यांनी आखली. यासाठी ते एका कारचा उपयोग करीत होते. कारच्या पॅसेंजर सीटला फोल्ड करून मागच्या सीटशी जोडले जात होते. विटाभट्टी परिसरात दूरवर पसरलेला परिसर आहे. येथे जड वाहने येत जात असतात. त्यामुळे आरोपींनी या परिसरालाच देहव्यापारासाठी निवडले. योगेश या टोळीचा सूत्रधार आहे. तो राहुल व इतर साथीदाराच्या मदतीने ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढू लागला. त्याची पीडित मुलीसह उत्तर नागपुरातील एका कथित विद्यार्थिनीसोबत ओळख आहे. या मुली पैशासाठी देहव्यापारासाठी तयार होतात. यामुळे आरोपीला तरुणीही सहज मिळू लागल्या. आरोपी दुपारी ४ नंतर आपला धंदा सुरू करायचे. ते ग्राहकाला कामठी रोड किंवा अन्य ठिकाणी बोलवायचे. तेथून आपल्या बाईकवर किंवा कारने विटाभट्टी परिसरात आणत होते. करमध्ये तरुणीसोबत वेळ घालवल्यानंतर ग्राहक परत जात होते. त्यांना दररोज पाच ते सहा ग्राहक सहज मिळायचे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. झोन पाचच्या पोलिसांना याची सूचना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता एका ‘डमी’ ग्राहकाला आरोपीकडे पाठवले.आरोपीने एक हजार रुपयात विद्यार्थिनीचा सौदा केला. डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून आरोपीला पकडले. ग्राहकाकडून वसूल करण्यात आलेल्या किमतीनुसार आरोपी व पीडित तरुणीमध्ये पैशाची हिस्सेवाटणी होत होती. आरोपीविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पीटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीएसआय जितेंद्र सोनटक्के आणि त्यांच्या चमूने केली.पीडित तरुणी वाईट संगतीमुळे बिघडलीपीडित २१ वर्षीय तरुणी ही उत्तर नागपुरातील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वाईट संगतीमुळे ती आरोपीच्या संपर्कात आली. तिलाही ऐशोआरामाने राहण्याचे व्यसन लागले. तिच्या घरच्यांनाही मुलगी हे काम करीत असल्याचे माहीत नाही. तिच्याप्रमाणेच अनेक मुलीही आरोपीच्या टोळीत सामील आहेत.विटाभट्टी परिसर नेहमीच चर्चेतविटाभट्टी परिसर नेहमीच चर्चेत राहिला आहे. वर्षभरापूर्वी गुन्हेगारांनी सीताबर्डी येथून एका मतिमंद मुलीचे अपहरण करून गँगरेप केला होता. तिचा खून करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्लाही केला होता. परंतु तेथून पळून ती वस्तीत गेल्याने तिचा जीव वाचला होता. या घटनेनंतरही परिस्थितीत फरक पडला नाही. या परिसरात खंडणी वसुलीचीही दहशत आहे. येथील बहुतांश विटाभट्टी अवैध आहेत. परिसरात कथित स्वयंघोषित नेते व गुन्हेगार त्यांच्याकडून वसुली करतात. रात्री गुन्हेगार परिसरात फिरत असतात. लुटपाटीच्या घटनाही नेहमी होत असतात.