नागपूर : आता कोणते वाहन कोणत्या इंधनावरील आहे, ते स्टिकर पाहून कळणार आहे. सध्या केवळ ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहनांवरच हिरव्या रंगाचे स्टिकर लावले जाते; परंतु लवकरच पेट्रोलच्या वाहनावर निळे तर डिझेलच्या वाहनावर नारंगी स्टिकर लागून येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केल्या आहेत. लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
वाहनासाठी इंधन म्हणून पूर्वी डिझेल आणि पेट्रोल हे दोनच पर्याय होते; परंतु आता विद्युत, एलपीजी, सीएनजी, सोलर असे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. विविध इंधनाचे वाहन ओळखू येण्यासाठी स्टिकर लावण्यात येणार आहे. तूर्तास, ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहन उत्पादन कंपन्या आपल्या वाहनांना हिरव्या रंगाचे स्टिकर लावून बाजारात आणत आहे. यामुळे लवकरच इतरही वाहनांवर त्यांच्या इंधनानुसार स्टिकर लागलेले असणार आहे. यासंदर्भात अधिकृत सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आलेल्या नाहीत; परंतु या संदर्भातील हालचालींना वेग आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील वाहने-
पेट्रोलवर चालणारी वाहने- १२,४०,५०७
डिझेलवर चालणारी वाहने- ४,४२,७००
इलेक्ट्रिक वाहने- ४५,५८४
सीएनजी वाहने- १५,४५०
एलपीजी/ पेट्रोल- १०,९५५
-कोणत्या वाहनांसाठी कुठल्या रंगाचे स्टिकर
पेट्रोल व सीएनजी वाहनाकरिता फिकट निळा, इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनाकरिता हिरवा तर डिझेल वाहनांकरिता नारंगी रंगाचे स्टिकर राहणार आहे.
-स्टिकर कुठे मिळणार?
वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना किंवा वाहनांची विक्री करणारे डीलरला अंतिम अधिसूचनेनुसार स्टिकर लावून द्यावे लागणार आहे. त्याशिवाय आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी होणार नाही. यासंदर्भात अंमलबजावणीचे आदेश लवकरच निघणार असल्याची माहिती आहे.
-स्टिकर नाही लावले तर...
स्टिकर लावले नसल्यास आरटीओमध्ये वाहनाची नोंदणी होणार नसल्याची व यामुळे वाहन विक्रीही करता येणार नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोट...
यासंदर्भातील अधिसूचना अद्याप निघाली नाही. आदेश आल्यानंतर स्टिकर लावण्यासंदर्भात नियम लागू होऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर