-सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला लागलेल्या आगीत ‘एक्झिट डोअर’ उघडलेच गेले नाही, यामुळे मृतांचा आकडा वाढला. ‘आरटीओ’ने याला उशिरा का होईना गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘एन्ट्री पाइंट’वरच आता वायू पथकाला २४ बाय ७ तैनात करून या ‘डोअर’ची प्रत्यक्ष तपासणी हाती घेतली आहे. या शिवाय, वाहनाची कागदपत्रे, टायर सुस्थितीत असल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी देत आहे.
समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७ अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत. शनिवारी झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खडबडून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत ९५ जणांचे जीव गेले आहेत. अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरुवातीपासून उपाययोजना केल्या जात असल्या तरी दरम्यानच्या काळात शिथिलता आली होती.
चालकाचे समुपदेशन
समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पाइंटवरच आता ‘आरटीओ’चे पथक प्रत्येक वाहनांची कागदपत्रे तपासत आहे. या सोबतच टायरची तपासणी केली जात आहे. कमी हवा असेल किंवा टायर गुळगुळीत झाले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत त्यांना परत पाठविले जात आहे. चालकांचे समुपदेशन केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, ट्रॅव्हल बसची विशेष तपासणी केली जात आहे. यात आपत्कालीन स्थितीत बाहेर पडणारा दरवाजा उघडतो किंवा नाही याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जात आहे. सर्व काही सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी दिली जात आहे.